Mon, Sep 21, 2020 17:18होमपेज › Arthabhan › साकल्याने अभ्यास करून व्हावी गुंतवणूक

साकल्याने अभ्यास करून व्हावी गुंतवणूक

Last Updated: Feb 10 2020 1:33AM
डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या आठवड्यात गुरुवारी रिझर्व्ह बँकेने आपले द्वैमासिक धोरण जाहीर केले. 3 रिझर्व्ह बँकेचे अधिकारी व तीन केंद्रीय अधिकारी यांची एक वित्त समिती गेली काही वर्षे कार्यान्वित आहे. ती रेपो दर निश्‍चित करते. द्रवता नियमित करण्यासाठी या दराचा उपयोग होतो. रेपो दरात जैसे थे धोरण ठेवल्यामुळे बाजारावर त्याचा खास परिणाम होणार नाही; मात्र नॉन बँकिंग क्षेत्रातील वित्त कंपन्यांना मोठ्या प्रमाणात द्रव्य पुरवठा होईल. त्यामुळे बजाज फायनान्स, एम अँड एम फायनान्स, एल अँड टी फायनान्स, बजाज फिनसर्व्ह यांचे भाव वाढत राहतील. गेल्या शुक्रवारी सकाळी बजाज फायनान्स 4643  होता. तीन वर्षात तो दुप्पट व्हावा. किंबहुना त्याहूनही जास्त म्हणजे 10000 रुपयांपर्यंत जावा, हा हरितपर्णी कल्पवृक्ष आपल्या अंगणात सदैव लावलेला असावा.

रिझर्व्ह बँकेने तीन वर्षांचा एक नवा दोन ट्रिलियन इतका निधी तीन वर्षांच्या रोख्यात जाहीर केला आहे. युरोपियन बँकांनी हा प्रयोग प्रथम केला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्याचे अनुकरण केले आहे. पुढील काही वर्षात 2 लक्ष कोटी रुपये बाजारात ओतले जातील. बँकांकडे भरपूर द्रवता असेल. त्यामुळे बँकांकडून दिली जाणारी कर्जे 0.30 टक्क्याने स्वस्त होतील. भारताची अर्थव्यवस्था बळकट आहे, असाच संदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे.

किरकोळ दरात व अन्‍नधान्याच्या दरात महागाई दिसून येते. ही वाढ 2019 मध्ये झालेली आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेची झालेली वाढ व त्याचवेळी चीन आणि रशिया या देशांच्या अर्थव्यवस्थेची झालेली पिछेहाट या सर्व पार्श्‍वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येण्याकडे वाटचाल करते आहे. याकडे रिझर्व्ह बँकेने लक्ष वेधले आहे. यामुळे रेपो दर पूर्वीप्रमाणेच 5.15 टक्के, तर रिझर्व्ह रेपो दर 4.90 टक्के ठेवण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या सहामाहीत चलनवाढ आणखी खाली येत 4 टक्के ते 3.8 टक्के यामध्ये राहील. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. मागच्या पाच पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने एकूण 1.35 टक्के दर क पात केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री. शक्‍तिकांत दास यांच्या मते, चालू आर्थिक वर्षात जीडीपी 5 टक्के राहील. जीडीपीची ही टक्केवारी गेल्या 11 वर्षातील सर्वात कमी टक्केवारी आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी जीडीपी 6 टक्के धरला आहे. सरकारने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात 2020-21 या वर्षात जीडीपी 6 ते 6.5 टक्के असेल, असे म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात निर्देशांक सतत वाढत होता. गेल्या शुक्रवारी तो 41306 होता, तर निफ्टी 12137 होता. काही शेअर्सचे भाव गेल्या शुक्रवारी असे होते.

बजाज फिनसर्व्ह 9626, लार्सन ट्रबो 1301, जिंदाल स्टील 200, दिलीप बिल्डकॉन जेएसडब्ल्यू स्टील 277, एपीएल अपोले 2023, जे कुमार इंडस्ट्रीज 147, स्टेट बँक ऑफ इंडिया 322, बँक ऑफ बडोदा 91, एचडीएफसी बँक 1234, मिंडा इंडस्ट्रीज 382, पॉवर फायनान्स कार्पोरेशन 125, डीसीबी बँक 177, महिंद्र सी आयइ 173, ज्युबिलंट 555, आरबीएल बँक 337, एचडीएफसी लाईफ इन्शुअरन्स 596, जीएचसीएल 180, पिरामल एंटरप्रायजेस 1588, अपोलो टायर 163, रेमंड 642, जे. के. टायर 72, बाळकृष्ण इंडस्ट्रीज 1098, फोर्स मोटर्स 1375, के. पी. आर. मिल 646, सिएट  लिमिटेड 981, अतुल 4954, ओबेरॉय रिअ‍ॅलिटी 529, पराग मिल्क 123, मॅगेनीज ओअर इंडिया लिमिटेड 151, मिधानी 163.

वर अनेक कंपन्यांचे भाव जरी दिले असले तरी गुंतवणूकदारांनी साकल्याने अभ्यास करून 5 ते 8 शेअर्समध्येच आपले पैसे गुंतवावे. बाजारात द्रवता जशी वाढेल तशी शेअर्समधील गुंतवणूकही आपोआप वाढेल. सरकारची सध्याची धोरणे शेअरबाजाराला अनुकूल आहेत. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत निर्देशांक 45000 होऊ शकतो. गुंतवणूकदारांची कंपन्यांचे तिमाही आकडे जेव्हा प्रसिद्ध होतात, तेव्हा ते आवर्जून बघितले पाहिजेत. जानेवारी 15 पासून असे आकडे यायला सुरुवात होते व फेब्रुवारी अखेरपर्यंत ते येत राहतात.
 

 "