Wed, Aug 12, 2020 02:51होमपेज › Arthabhan › 'या' दहा डेडलाइन्स आपल्यासाठी!

'या' दहा डेडलाइन्स आपल्यासाठी!

Last Updated: Jan 13 2020 7:51PM
अपर्णा देवकर

पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत गृहकर्जाच्या अंशदानाची शेवटची तारीख, पीएमव्हीव्हीवायमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख, पॅन-आधार लिंक करणे आदींची डेडलाइन लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नवीन वर्ष आपल्याला आर्थिकद़ृष्ट्या समाधानकारक व्यतीत करायचे असेल, तर वर्षभरातील आर्थिक व्यवहाराशी निगडित आपल्या डेडलाइन जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. अर्थात, अर्थविषयीचा मुद्दा निघतो तेव्हा संपूर्ण माहितीसह सज्ज असणे गरजेचे आहे. नवीन वर्ष 2020 हे आरामात जाण्यासाठी काही डेडलाइन्स लक्षात ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. या आधारावर आपण अनेक अडचणींपासून वाचू शकता. म्हणूनच आर्थिक कामाशी निगडित काही महत्त्वाच्या तारखा जाणून घेऊ या. 

पंतप्रधान घरकुल योजना 

पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत गृहकर्जाच्या अंशदानाची शेवटची तारीख 31 मार्च आहे. मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पीएमवाय योजनेंतर्गत 31 मार्च 2020 पर्यंत लाभ मिळू शकतो. काही अटी आणि नियमांच्या आधारे एमआयजी (मिडल इन्कम क्लास) वन अँड 2 असणारे नागरिकही घर खरेदीत क्रेडिटमध्ये सबसिडी घेऊ शकतात. एमआयजी-1 मध्ये वार्षिक वेतन 6 ते 12 लाख आणि एमआयजी 2 मध्ये वार्षिक वेतन हे 12 ते 18 लाख असणार्‍यांना अंशदानाचा लाभ घेता येईल. दोन्हीसाठी अनुक्रमे चार आणि तीन टक्के सबसिडी मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. 

पंतप्रधान वयवंदन योजना 

पीएमव्हीव्हीवायमध्ये गुंतवणुकीची शेवटची तारीख 31 मार्च आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन स्क्रिम-पंतप्रधान वयवंदन योजना (पीएमव्हीव्हीवाय) मध्ये दहा वर्षांसाठी गॅरेटेंड पेन्शन मिळते. यात 8 ते 8.3 टक्के परतावा मिळतो. हा परतावा मुदत ठेवीपेक्षा अधिक आहे. यात गुंतवणुकीची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. 

विलंबासह आयटीआर आणि पुनर्विचाराचे आयटीआर

जर 2018-19 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत आयटीआर दाखल केले नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपर्यंत आयटीआर दाखल करणे गरजेचे आहे. जर ही तारीख चुकवली तर आयटीआर दाखल करू शकणार नाहीत. त्यानंतर जोपर्यंत आपल्याला आयटीआर भरण्यास आयटी विभाग सांगत नाही तोपर्यंत आयटीआर भरू शकणार नाहीत. लक्षात ठेवा, लेट फायलिंगसाठी दहा हजार रुपयांच्या विलंबा शुल्कासह आयटीआर भरावा लागेल. जर रिवाइज्ड रिटर्न भरू इच्छित असाल, तर त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. 

भाड्यावर टीडीएस जमा करणे 

सरकारकडे भाड्यावर टीडीएस जमा करण्याची शेवटची तारीख टॅक्स डिडक्शनच्या तारखेवर अवलंबून असते. जर आपण भाड्याच्या घरात राहत असाल आणि 50 हजारांपेक्षा अधिक भाडे देत असाल, तर आपल्याला प्राप्तीकर कायद्याच्या हिशेबाने आपल्याला भाड्यावर टीडीएस भरावा लागेल. एका आर्थिक वर्षाच्या दरम्यान एकूण भाड्यावर 5 टक्के टॅक्स डिडक्शन करावे लागेल. हे डिडक्शन घर सोडताना किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भरता येते. यात जी तारीख पहिली येईल त्यानुसार टीडीएस भरणे गरजेचे आहे. सरकारकडे डिडक्शनच्या शेवटच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत टीडीएस जमा करावा लागतो, अन्यथा दंड भरावा लागेल. 

कर सवलतीच्या योजना

जर कर वाचवायचा असेल तर 31 मार्चच्या अगोदर कर सवलतीच्या योजनेत गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी. जर या तारखेअगोदर गुंतवणूक केली नाही, तर करसवलतीच्या लाभाचा दावा करता येणार नाही आणि नियमानुसार कर भरावा लागेल. उदा. 30 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये असणारे करदाते कलम 80-सी अंतर्गत दीड लाख रुपयांची गुंतवणूक करून 46 हजार 800 रुपयांची करसवलत मिळवू शकतात.

गुंतवणुकीची कागदपत्रे गोळा करणे 

वेतनातून अधिक टीडीएस कापला जाणार नाही यासाठी गुंतवणुकीसंदर्भातील पुरावे, कागदपत्रे कंपनीकडे जमा करावेत. कर वाचवण्यासाठी आपल्या गुंतवणुकीची कागदपत्रे, भाडेकरारपत्र जमा करावे. प्रत्येक कंपनीत कागदपत्रे जमा करण्याच्या तारखा वेगवेगळ्या असतात. एचआर आणि फायनान्स डिपार्टमेंटकडून त्याची तारीख जाणून घ्या आणि त्यानुसार कागदपत्रे गोळा करा, अन्यथा वेतनातून अधिक टीडीएस कापला जाईल.

टीडीएस सर्टिफिकेट जमा करणे 

आयटीआर दाखल करताना पहिली प्रक्रिया म्हणजे कंपनीकडून मिळणारे टीडीएस सर्टिफिकेट. जर टीडीएस कापला गेला असेल, तर बँकेकडूनही सर्टिफिकेट घ्यावे लागेल. कंपनी आपल्याला फॉर्म 16 देते आणि त्यास आपण टीडीएस सर्टिफिकेट असेही म्हणू शकतो. यात टीडीएसचे विवरण असते. व्याजाची रक्कम दहा हजारांपेक्षा अधिक असेल, तर बँकदेखील डिडक्टेड टॅक्ससाठी फॉर्म 16 (ए) जारी करते. सीनियर सिटिजन्साठी ही मर्यादा 50 हजार रुपये आहे. बँक आणि कंपनी पंधरा जूननंतर टीडीएस सर्टिफिकेट देण्यास प्रारंभ करतात. 

2019-20 साठी आयटीआर

31 मार्च 2020 पर्यंत कर सवलत देणार्‍या बचत योजनांचे काम पूर्ण झाल्यानंतर आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुरू होते. हिंदू संयुक्त कुटुंब (एचयूएफ)साठी आयटीआर दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै आहे. काही वेळा त्यास मुदतवाढही दिली जाते. जर त्या तारखेनंतर आयटीआर भरल्यास अतिरिक्त शुल्कही भरावे लागते. एक ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत फायलिंगवर 5 हजार रुपयांची पेनल्टी आणि 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या दरम्यान आयटीआर भरल्यास दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. अर्थात, लहान स्वरूपातील करदात्यासाठी दंडाची रक्कम 1 हजार रुपये आहे.

पॅन-आधार लिंक

पॅन आणि आधार लिंकिंगची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. यापूर्वी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख निश्चित केली होती. जर मुदतीत पॅन आणि आधार लिंक केले नाही, तर आपला पॅन क्रमांक इन-ऑपरेटिव्ह होऊ शकतो. 

वाहनांसाठी फास्टॅग

फास्टॅग सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. पंधरा जानेवारीपर्यंत वाहनांना फास्टॅग लावले नाही, तर टोल नाक्यावर दुप्पट चलन फाडावे लागणार आहे. त्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. आता ती 15 जानेवारी करण्यात आली आहे.