होमपेज › Arthabhan › अर्थवार्ता

अर्थवार्ता

Last Updated: Feb 24 2020 1:28AM

संग्रहित फोटोप्रीतम मांडके

 

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक अनुक्रमे 32.60 आणि 87.62 अंकांनी घसरून 12080.85 व 41170.12 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये 0.27 टक्के आणि 0.21 टक्क्यांची घसरण दर्शवली गेली.

स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेला एसबीआय कार्डसचा आयपीओ 2 मार्चपासून खुला होणार. 5 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावण्याची मुभा देण्यात आली आहे. या समभाग विक्रीद्वारे 9000 कोटींचा निधी उभा करण्याचा कंपनीचा मानस आहे. समभागांचा किंमत पट्टा 750 रुपये ते 755 रुपयांदरम्यान ठरवण्यात आला असून दर्शनी मूल्य 10 रु. प्रतिसमभाग निश्चित करण्यात आले. एकूण 13.05 कोटी समभागांची विक्री करण्यात येणार आहे. एचबीआय कार्डसमध्ये एकूण 76 टक्के हिस्सा स्टेट बँकचा असून उर्वरित हिस्सा कार्लाईल या परदेशातील गुंतवणूकदार उद्योग समूहाकडे आहे. स्टेट बँकेच्या समभागधारकांना एसबीआय कार्डसमध्ये प्रतिसमभाग 15 रुपयांची सवलत मिळू शकेल.

केंद्रीय दूरसंचार विभागाने भारती इन्फ्राटेल आणि इंडस टॉवर या मोबाईल टॉवर उभारणी क्षेत्रातील कंपन्यांच्या एकत्रीकरणास मान्यता दिली. या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणातून निर्माण होणार्‍या कंपनीकडे देशातील 1 लाख 63 हजार मोबाईल टॉवर्स असतील. भारती इन्फ्राटेल आणि व्होडाफोन इंडस टॉवर्समध्ये 42 टक्क्यांचे भागधारक आहेत.

सुमारे 1.5 लाख कोटींचा एजीआर ड्यूज (कर थकबाकी) असणार्‍या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. लवकरच कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या दूरसंचार कंपन्यांसाठी स्ट्रेस फंडची स्थापना करण्यात येणार. यासाठी बँकांमार्फत निधी उभा करण्यात येणार. दूरसंचार कंपन्या या फंडाकडून काही सवलतींसह कर्ज घेऊन थकबाकी फेडतील आणि सुलभ हप्त्यामध्ये कर्जाची परतफेड बँकांना करतील, असे या योजनेचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे परवाना शुल्क, वापर शुल्क भरण्याची मुदत सरकारतर्फे पुढे ढकलण्याचा विचार यासंबंधी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा निर्णय 17 मार्चपूर्वी येणे अपेक्षित आहे.

दिवाळखोर ‘दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’ कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत 934 कोटींचा नफा जाहीर केला. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 6705 कोटींचा तोटा सोसावा लागला होता.

अ‍ॅक्सिस बँक मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये 20 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील. सध्या अ‍ॅक्सिस बँकेचा मॅक्स लाईफमध्ये 2 टक्के हिस्सा. अ‍ॅक्सिस बँक मॅक्स लाईफमध्ये 2 हजार कोटी रुपये गुंतवण्याच्या तयारीत. सध्या मॅक्स लाईफमध्ये मॅक्स फायनान्शिअल या कंपनीचा 70 टक्के हिस्सा.

डीमॅट स्वरूपातील समभाग हाताळणारी ‘एनएसडीएल’ या कंपनीचा आयपीओ बाजारात लवकरच येणार. आयपीओचे मूल्य 1 हजार कोटींच्या जवळपास असण्याची शक्यता. कंपनीचे एकूण बाजारमूल्य 3500 कोटींचे असण्याचा तज्ज्ञांचा अंदाज. एनएसडीएलमध्ये सध्या आयडीबीआय बँकेचा 24 टक्के तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा 30 टक्के हिस्सा अस्तित्वात आहे.

धातू उत्खनन व प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील कंपनी ‘वेदांता’ 2 हजार कोटींचे ट्रस्टच्या कालावधीचे रोखे ‘एलआयसी’ला विकण्यासाठी प्रयत्नशील. या रोख्यांचा परतावा सुमारे 8.5 टक्के ते 9 टक्क्यांच्या दरम्यान असेल तसेच कालावधी 10 वर्षांचा असेल.

रिलायन्स इंडस्ट्रीज मनोरंजन क्षेत्रातील आपल्या 3 उपकंपनी एकत्र करणार. टीव्ही 18 ब्रॉडकास्ट, हॅथवे केबल अँड डाटाकॉम तसेच डेन नेटवर्क एकत्र करून नेटवर्क 18 मीडिया ही एकच कंपनी उभी करणार.

जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनी जीएमआर एनर्जीचा ओडिशा पॉवर प्लांट 5321 कोटींना विकत घेणार.14 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 3.091 अब्ज डॉलर्सनी वधारून 476.092 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली.