होमपेज › Arthabhan › काँट्रा : प्रवाहाविरुद्ध पोहणारा फंड

काँट्रा : प्रवाहाविरुद्ध पोहणारा फंड

Last Updated: Jan 13 2020 1:01AM
भरत साळोखे

सेबीच्या नियमानुसार Contra Fund मधील किमान 65 टक्के गुंतवणूक ही इक्विटी, म्हणजे शेअर्स आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये झाली पाहिजे; आणि ती गुंतवणूक करताना फंड मॅनेजरने Contrarian Investing Strategy चा वापर केला पाहिजे.

मागच्या लेखात आपण पाहिले की, सेबीच्या म्युच्युअल फंड वर्गवारीच्या कोष्टकमध्ये इक्विटी फंडांच्या 7व्या क्रमांकावर दोन प्रकारच्या फंडांना एकाच वर्गवारीमध्ये समाविष्ट केले आहे; व्हॅल्यू फंड आणि काँट्रा फंड. व्हॅल्यू फंडांची माहिती आपण मागील लेखात घेतली. या लेखात आपण काँट्रा (Cauntra) फंडांची माहिती घेऊ.

Contra Fund  म्हणजे काय? सेबीच्या नियमानुसार Contra Fund व मधील किमान 65 टक्के गुंतवणूक ही इक्विटी म्हणजे शेअर्स आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये झाली पाहिजे आणि ती गुंतवणूक करताना फंड मॅनेजरने Contrarian Investing Strategy चा वापर केला पाहिजे.

आता Contrarian Investing Strategy म्हणजे काय? या स्टॅ्रटेजीचा सर्वात मोठा पुरस्कर्ता, वॉरन बफे यांनी त्यांच्या एका जगप्रसिद्ध उद्गारामध्ये या स्टॅ्रटेजीचा सारांश सांगितला आहे, "Be fearful when others are greedy and greedy when others are fearful."  हे वॉरन बफेनी एकंदर शेअर मार्केटविषयी सांगितले असले तरी हेच तत्त्व जेव्हा स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना अंमलात आणले जाते तेव्हा ती गुंतवणूक Contrarian Investing Strategy नुसार होते. मराठीत सांगायचे तर,Contrarian Investing Strategy म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे.

व्हॅल्यू फंड आणि काँट्रा फंड हे एकाच वर्गवारीमध्ये घालण्याचे कारण म्हणजे दोन्ही फंडांचे मूलभूत तत्त्व एकच आहे, आणि ते म्हणजे 'Value Stocks' मध्ये गुंतवणूक करणे. मात्र Contrarian Investing फंड मॅनेजर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, ज्या कंपन्यांची मालमत्ता मोठी आहे; व्यवस्थापन अतिशय चांगले आहे, आणि ज्यांची भविष्यामध्ये विस्तार पावण्याची क्षमता प्रचंड आहे. याउलट Value Investing  फंड मॅनेजर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, ज्या अगोदरच मार्केटमध्ये सुस्थापित झाल्या आहेत; आणि त्यांचा लौकिक अतिशय चांगला आहे.

इथे प्रश्न असा उत्पन्न होतो की, अशा कंपन्या जर इतक्या सुस्थापित असतील, त्यांचा लौकिक चांगला असेल; व्यवस्थापन उच्च दर्जाचे असेल आणि ताळेबंद भक्कम असेल, तर त्यांचे बाजारभाव इतके कमी होतातच कसे? David Dreman नावाचे एक कॅनेडीयन गुंतवणूक तज्ज्ञ आहेत. ते Contrarian Strategy साठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या Contrarian Investing Strategy : The next generation या पुस्तकामध्ये त्यांनी वरील प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ते म्हणतात, मार्केटमध्ये नवनवीन घटना घडतात, विविध बातम्या येतात, ट्रेंडस् बदलत राहतात. या सर्वांना गुंतवणूकदार वाजपीपेक्षा जास्त प्रतिसाद देतात. अशा वेळी नको ते स्टॉक्स ‘हॉट’ होतात आणि त्यांचे बाजारभाव वाढतात. त्यामुळे आणि इतरही काही तात्कालिक नकारात्मक बातम्यांमुळे Value Stocks  चे बाजारभाव खूप खाली येतात. Contrarian फंड मॅनेजर अशा स्टॉक्समध्ये संधी शोधत असतात. कारण त्यांना माहिती असते, अशा स्टॉक्सची  Intrinsic Value खूप जास्त आहे. कमी भावात अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली, तर थोड्याच काळामध्ये त्यांना योग्य तो भाव मिळण्याची खात्री असते.

आपण बाजारातील Contra फंडांचा इतिहास पाहिला, तर अशा फंडांनी नेहमीच इतर फंडांच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे. किंबहुना आगामी काळात मोठा नफा मिळविण्याची क्षमता असणे हाच या फंडांमधील गुंतवणुकीचा Unique Selling Point आहे. इथे वॉरन बफेंचे एक उदाहरण द्यावेसे वाटते. 2008 च्या मार्केट क्रॅशमध्ये सर्वात जास्त भरडले गेले ते अमेरिकन बँकिंग स्टॉक्स! बँकांचे बाजारभाव धडाधड कोसळत असताना वॉरन बफेंनी त्यांच्या Be greedy when others are fearful या तत्त्वाचा अवलंब केला आणि Goldman Sachs या बँकेत पाचशे कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली. याच गुंतवणुकीने त्यांना 2013 मध्ये म्हणजे पाच वर्षांनी 62 टक्के परतावा दिला, तर 10 वर्षांनी 196 टक्के परतावा दिला. 

काँट्रा फंडांमधील गुंतवणूक ही  Value स्टॉक्समध्ये होत असल्यामुळे ती सुरक्षित असते. Value Stock मधील गुंतवणूक असली तरी ती Intrinsic Value च्या खूपच खाली, म्हणजे अतिशय कमी भावात होत असल्यामुळे भावी काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे सर्व थरांतील, वयोगटातील गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा थोडा तरी हिस्सा अशा फंडांमध्ये गुंतवावा. त्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या गुंतवणुकीचा कालावधी किमान पाच वर्षांचा असू द्यावा. कारण, काही वेळा Value Stocks सुद्धा त्यांच्या योग्य पातळीवर येण्यास बराच कालावधी घेण्याची शक्यता असते. सध्या भारतामध्ये आघाडीवर असणारी Contra फंडस् खालीलप्रमाणे आहेत.

1) Invesco India Contra Fund
2) Kotak India Eq. Contra Fund
3) SBI Contra Fund.