Sat, Dec 05, 2020 02:17होमपेज › Arthabhan › ऑनलाईन व्यवहार रद्द झाल्यास...

ऑनलाईन व्यवहार रद्द झाल्यास...

Last Updated: Oct 21 2019 1:30AM
जगदीश काळे

सरकारकडून डिजिटल/ ऑनलाईन व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याने डिजिटल व्यवहारामुळे ग्राहकांच्या बँकिंग कामात सुलभता आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन व्यवहारात होणार्‍या घोळामुळे ग्राहक पुन्हा रोख रकमेचा मार्ग निवडत आहेत.  

आरबीआयच्या नवीन नियमानुसार एखाद्या डेबिट कार्डने केलेला व्यवहार पूर्ण झाला नसेल, तर या संदर्भातील तक्रारीचा निकाल बँकांना पाच दिवसात लावावा लागणार आहे. त्याचवेळी यूपीआय, वॉलेटआधारित व्यवहाराच्या तक्रारीसंदर्भात कंपन्यांकडे एक दिवसाचा कालावधी दिला आहे. तक्रारीचा निपटारा वेळेत झाला नाही तर, दर दिवशी शंभर रुपये याप्रमाणे कंपनीला दंड भरावा लागणार आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी 15 ऑक्टोबरपासून होणार आहे. खात्यात रक्कम असताना आणि एटीएमचा वापर करूनही पैसे निघाले नसतील, मात्र खात्यावर डेबिट पडले असेल तर त्यास ट्रान्झेक्शन फेल असे म्हटले जाते. याप्रमाणे यूपीआय आणि वॉलेटचा वापर करूनही समोरील पार्टीला पैसे न मिळाल्यास ट्रान्झेक्शन फेल असा त्याचा अर्थ धरला जातो. 

ग्राहक जबाबदार नाही : एखादा ऑनलाईन व्यवहार अपयशी झाला तर त्यासाठी ग्राहकाला जबाबदार धरता येणार नाही. आरबीआयच्या नव्या अधिसूचनेनुसार सर्वप्रकारच्या ऑनलाईन ट्रान्झेेक्शन अपयशाला ग्राहक जबाबदार असतीलच, असे नाही. आरबीआयने ऑनलाईन व्यवहारातील त्रुटींबाबत दंडात्मक कारवाईसाठी एटीएम, पीओएस, यूपीआय, वॉलेट आणि ऑनलाईन बँकिंगला या आदेशात आणले आहे. त्याची भरपाई संबंधिताकडून केली जाईल.

टीएटीनुसार निर्देश : आरबीआयने दिलेला ताजा निर्देश टर्न अराऊंड टाइम (टीएटी) वर आधारित दिला आहे. यानुसार ग्राहकांच्या तक्रारीची वाट न पाहता बँका किंवा वित्तीय कंपनीने ऑनलाईन व्यवहारातील नुकसान भरपाई तातडीने करणे अपेक्षित आहे. 

या कारणामुळेही घोळ : आरबीआयच्या परिपत्रकानुसार काही व्यवहार अपयशी होण्यास अनेक कारणे असू शकतात. अशा कारणात ग्राहक जबाबदार नसतील तर बँकेला जबाबदार धरले जाईल. याप्रमाणे इंटरनेट लिंक्समध्ये गडबड, एटीएममध्ये रोकड नसणे, टाइम आऊट सेशेन्स आदी. जर यापैकी कोणत्याही कारणांमुळे व्यवहाराला अडथळा आल्यास बँकेला भरपाई द्यावी लागेल.  ग्राहकाला भरपाई मिळाली नाही, तर आरबीआयच्या बँकिंग लोकपालकडे आपण तक्रार करू शकतो. 

दंडाची तरतूद :  ऑनलाईन किंवा एटीएमवरील एखादा व्यवहार पूर्ण झाला नाही तर बँकेने त्याचा निपटारा पाच दिवसात करणे अपेक्षित आहे. तसेच वॉलेट कंपन्यांना हा कालावधी केवळ एकच दिवसाचा दिला आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी 15 ऑक्टोबरपासून होणार आहे.  

एटीएम ऑनलाईन व्यवहार : एटीएममधून पैसे कट झाल्यास पण रोख रक्कम न आल्यास बँकांना पाच दिवसात संबंधित रक्कम द्यावी लागेल. अन्यथा दररोज शंभर रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.

वॉलेटने फंड ट्रान्स्फर : जर खात्यातून पैसे कटल्यास मात्र समोरील व्यक्तीस न मिळाल्यास एका दिवसात ती रक्कम परत करावी लागली आहे. अन्यथा वॉलेट कंपन्यांना दुसर्‍या दिवसांपासून शंभर रुपयांचा दंड द्यावा लागेल. 

कार्ड टू कार्ड व्यवहार : एका कार्डातून डेबिट झालेला पैसा दुसर्‍या कार्डामध्ये न गेल्यास बँकांना एका दिवसातच ती रक्कम परत द्यावी लागेल. अन्यथा दररोज शंभर रुपये याप्रमाणे ग्राहकाला दंड द्यावा.