उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यात अयोध्या शहर आहे. अयोध्या या शब्दाचा अर्थ होतो ‘कोणत्याही योद्ध्याला जिंकण्यास अशक्य अशी नगरी.’ गुप्त राजघराण्याच्या कालखंडात 4 थ्या ते 5 व्या शतकात अयोध्येला अतिशय महत्त्व आले. प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला, असे या काळात मानण्यात येऊ लागले. हिंदू धर्मीयांच्या सर्वात पवित्र मानल्या जाणार्या सात तीर्थस्थळांत (सप्तपुरी) मध्ये अयोध्येचा समावेश झाला. इतर सहा पवित्र तीर्थस्थळे होती; मथुरा, वाराणसी, द्वारका, हरिद्वार, कांचीपुरम् व उज्जैन.
अयोध्या शहर शरयू नदीच्या किनारी वसलेले आहे. अयोध्या बौद्ध व जैन धर्मीयांसाठीही पवित्र आहे. याचे कारण, भगवान गौतम बुद्ध व महावीर यांनी या शहरात निवास केला होता. अनेक राजघराण्यांनी अयोध्येवर राज्य केले. मौर्य व गुप्त राजघराण्याचा या शहरावर काही काळ अंमल होता. अयोध्येचे महत्त्व मिहीरकुल या हुण राजाच्या आक्रमणानंतर लयाला गेले.