Fri, Jul 03, 2020 16:13होमपेज › Ankur › चोरावर मोर

चोरावर मोर

Last Updated: Nov 30 2019 1:48AM
गणेशपूर शहरात चतुरएवढा हुशार चोर कोणीच नव्हता. जर कधी एखाद्या चोरीचा छडा लागला नाही, तर पोलिसांना लक्षात यायचं की चतुरनेच आपले शर्विलकी कौशल्य दाखवले आहे. अनेक चोर चतुरचा मत्सर करायचे. चुन्नीलाल अशाच चोरांपैकी एक होता. एकदा एका श्रीमंत जमीनदाराकडे चोरी झाली. चोराने जमीनदाराच्या तिजोरीतील शंभर सोन्याच्या नाण्यांवर डल्ला मारला. हे काम चतुरचेच असल्याची सर्वांना खात्री होती. चतुर लवकरच शहरातून पसार होणार आहे, हे ऐकून चुन्नीलालने चोराच्याच घरी चोरी करायचे ठरविले. चतुरच एकटा हुशार नाही हे त्याला इतर चोरांना दाखवून द्यायचे होते. चुन्नीलाल चतुरच्या घरी गेला. चतुर सामान बांधण्याच्या तयारीत होता. चुन्नीलाल म्हणाला, “भावा! तू हे शहर कायमचा सोडून चालला आहेस हे कळलं. मला तुझ्याबरोबर शेवटची रात्र रहायला दे. तुझ्या हस्तकौशल्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.”

चतुरने होकारार्थी मान हलवली व म्हणाला, “ठीक आहे. जरा हातपाय धुऊन घे, मी तुझा पलंग तयार करतो.” दोघांनी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या व नंतर ते झोपी गेले. चुन्नीलाल झोपेचे सोंग घेऊन पडून राहिला. मध्यरात्री चतुर गाढ झोपी गेल्याची खात्री करून चुन्नीलालने सारे घर धुंडाळले. कपाट, स्वयंपाकघर, चतुरचे सामान; मात्र कशातच सोने आढळले नाही. बर्‍याच वेळच्या अयशस्वी शोधानंतर चुन्नीलाल थकून झोपी गेला. सकाळी चतुर व चुन्नीलाल रेल्वे स्थानकावर आले. रेल्वेत चतुर चढत होता तेव्हा चुन्नीलालने न राहवून विचारले. “मी  रात्री तुझे सर्व घर धुंडाळले पण मला सोने सापडले नाही. तू सोने लपवले तरी कुठे होतेस?”

“मला माहीत होते, तू सोने चोरण्यासाठी आला आहेस. त्यामुळे मी अशा जागी सोने लपवले जेथे शोधण्याचा प्रयत्न तू करणार नाहीस.” चतुर हसत म्हणाला.

“कोणत्या जागी?” चुन्नीलालने आश्चर्याने विचारले.

“तुझ्या पलंगाखाली!” चतुरने शांतपणे उत्तर दिले.