Fri, Apr 03, 2020 08:41होमपेज › Ankur › कथा : मूर्ख माकडे

कथा : मूर्ख माकडे

Published On: Sep 07 2019 2:05AM | Last Updated: Sep 07 2019 2:05AM
एकदा एका जंगलात आठ दिवस व आठ रात्री सतत पाऊस कोसळत राहिला. त्या मुसळधार पावसामुळे जंगलातील अनेक झाडे व प्राणी वाहून गेले. काही नशिबवान प्राणी उंच डोंगरावर निघून गेले व ते या भयानक पुरापासून बचावले. उंच झाडावर आश्रय घेतलेली माकडे अशाच नशिबवान प्राण्यांपैकी होती. फांद्यांवर बसून माकडे खालून वाहणार्‍या पाण्याच्या लोंढ्याकडे भयचकित नजरेने पाहत होती. त्यांना पाण्यातील छोटे मासे स्पष्ट दिसत होते. कळपातील एक माकड माशांकडे बोट दाखवत म्हणाला,

“पुराच्या पाण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करणार्‍या या लहान प्राण्यांकडे पहा. त्यांना हात-पायच नाहीत. आपण जर त्यांना मदत केली नाही, तर ते नक्‍कीच पाण्यात बुडणार.”
दुसर्‍या माकडाने सल्‍ला दिला, “आपण खाली उतरू व जेथे पाणी खोल नसेल तेथे जाऊन आपल्या मित्रांना बाहेर काढू.” 

सर्व माकडे हे परोपकाराचे काम करण्यास तयार झाली. त्यांनी खाली उतरून पाण्यातील माशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. बर्‍याच माशांना बाहेर काढून कोरड्या जमिनीवर ठेवल्यावर तेथे माशांचा एक ढीगच तयार झाला. काही वेळानंतर एका माकडाने पाहिले, तर कोणताच मासा हालचाल करत नव्हता. सर्व माकडे त्या माशांकडे समाधानाने पाहू लागली.

“पहा, किती दमल आहेत हे  प्राणी. आता त्यांना शांत झोप लागली आहे.” एक वृद्ध माकड म्हणाले, “मूर्ख प्राणी! आपण एवढे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांना काही कळतच नव्हते. आपल्यापासून सुटण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यांना आपला प्रामाणिक उद्देशच कळत नव्हता. आता ते जेव्हा  जागे होतील तेव्हा मृत्यूच्या कराल दाढेत जाण्यापासून वाचवल्याबद्दल ते आपले नक्‍कीच आभार मानतील.”