कथा : नाचणारा लांडगा

Last Updated: Nov 09 2019 2:08AM
Responsive image


ती पौर्णिमेची बहारदार संध्याकाळ होती. एक मोठा करडा लांडगा जंगलातून शिकारीचा शोध घेत हळुवार चालला होता. अचानक त्याच्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियाला पक्ष्यांचा गंध जाणवला. त्याने वर पाहिले, तर एका वावळ वृक्षाच्या फांदीवर तीन जाडजूड तितर पक्षी बसले होते. त्या पक्ष्यांना पाहून लांडग्याच्या तोंडाला पाणी सुटले. ‘या उंच फांदीवर बसलेल्या पक्ष्यांना जर खाली आणता आले तर चांगली मेजवानी होईल.’ लांडगा मनाशीच म्हणाला. त्याच्या डोक्यात एक कल्पना घोळू लागली. “वा!” स्वत:च्याच कल्पनेवर खूश होत लांडगा उद‍्गारला. चंद्राच्या मंद प्रकाशाचा कवडसा झाडाखाली पडला होता. लांडग्याने तेथे नाचण्यास सुरुवात केली. पाठच्या पायांवर उभे राहत त्याने स्वत:भोवती एक गिरकी मारली. त्याची झुबकेदार चंदेरी शेपटीही गर्रकन फिरली. नंतर लांडगा मागे-पुढे उड्या मारत बहारदार नृत्य करू लागला. तितर पक्षी संमोहित झाल्याप्रमाणे त्याच्या नृत्याकडे पाहू लागले. नंतर लांडग्याने पुढचे दोन्ही पाय आकाशाकडे केले. क्षणात तो जमिनीवर पडला. नंतर त्याने आपले डोके जमिनीवर फिरवण्यास सुरुवात केली. 

लांडग्याला दम लागला होता. स्वत:ची जीभ बाहेर काढून त्याने थोडा थंडावा मिळवला. ताजातवाना होऊन लांडगा पुन्हा स्वत:भोवती गिरक्या घेऊ लागला. तितर पक्षी त्याला पाहताना देहभान विसरले. लांडग्याच्या गिरकी नृत्याकडे पाहून त्यांना गुंगी यायला लागली. ते तिन्ही तितर पक्षी त्यांना काही कळायच्या आत झाडावरून खाली पडले. लांडगा या क्षणाचीच वाट पाहत होता. ती रात्र लांडग्यासाठी मेजवानीची रात्र ठरली.