Sun, Aug 09, 2020 01:59होमपेज › Ahamadnagar › कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा रामराज्य आणू

कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा रामराज्य आणू

Last Updated: Oct 10 2019 1:04AM
जामखेड/नान्नज ः प्रतिनिधी

कर्जत-जामखेडमध्ये गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री राम शिंदे यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. विरोधकांचे मतदारसंघात योगदान काय, असा सवाल करीत मतदारांच्या आशीर्वादाने पुन्हा रामराज्य आणू, लंकेत ( बारामती) सोन्याच्या विटा आहेत, पण ते तुमच्या कामाचे नाहीत, असा टोला  भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी  पवार यांना लगावला.

 पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी नान्नज येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाघ बोलत होत्या. यावेळी माजी सभापती आशाताई शिंदे, सरपंच विद्याताई मोहळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, बाजार समितीच्या उपसभापती शारदा भोरे, पंचायत समितीच्या सदस्या मनीषा सुरवसे, माजी नगराध्यक्षा अर्चना राळेभात, धनलक्ष्मी हजारे, मायाताई आव्हाड, दीपाली गर्जे यांच्यासह विविध गावांतील महिला सरपंच व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

वाघ म्हणल्या की, देशात 50 टक्के महिला आहेत. हिंदू महिलांबाबत जसे कायदे आहेत, त्याचप्रमाणे मुस्लिम महिलांना न्याय मिळावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक कायदा मंजूर करून न्याय दिला. महिलांच्या डोक्यावरील सरपणाचे ओझे कमी करून उज्ज्वला गॅस योजनेद्वारे शंभर रुपयांत गॅस कनेक्शन देऊन प्रत्येक कुटुंब चूलमुक्त व धूरमुक्त केले. त्यामुळे  महिलांच्या जीवनात परिवर्तन झाले असून, त्यांना वेळ मिळाला आहे. या मिळालेल्या वेळेत तात्पुरता गृहउद्योग न करता महिलांना दररोज काम मिळेल. यासाठी महिला बचतगटांमार्फत उद्योग उभारला जाईल. त्यासाठी महिला अर्थिक विकास महामंडळामार्फत भांडवल उपलब्ध करून, उद्योगाबाबत शिक्षण दिले जाणार आहे.

आशाताई शिंदे म्हणाल्या की, घराणेशाहीविरुद्ध लोकशाही असे निवडणूक आहे. या गणातून मी पंचायत समितीला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवडून आले. मंत्री शिंदे यांच्या पाठीमागे वारस कोणी तयार केले नाही. आई-वडील वृद्ध आहेत. मी घरकाम व मुलगा लहान आहे. यामुळे आमचे कुटुंब तुम्ही आहात. तुम्ही आमचे नातेवाईक आहात. समोरचा माणूस प्रस्थापित आहे. पन्नास वर्षांपासून ते राजकारणात आहे. मग यापूर्वी ते सत्तेत होते, त्यांचे कोणी हात धरले होते का? विकास करण्यासाठी? असा सवाल शिंदे यांनी केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला अध्यक्षा कविता जगदाळे यांनी केले, तर आभार सरपंच विद्याताई मोहळकर यांनी मानले.