होमपेज › Ahamadnagar › वर्दी चोरीला की चारीला?

वर्दी चोरीला की चारीला?

Published On: Aug 17 2018 1:33AM | Last Updated: Aug 17 2018 1:33AMशेवगाव : रमेश चौधरी

‘खाकी वर्दी चोरीला की विसरली चारीला’ अशी तालुक्यात उलटसुलट चर्चा चालू आहे. हे प्रकरण चांगलेच चिघळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेवगावच्या पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

सव्वा सहा लाख रुपयांची फसवणूक आणि खाकी वर्दीची चोरी, हे लागोलागा दाखल झालेले दोन गुन्हे सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. यामागचे नेमके कारण काय, याबाबत उलट-सुलट चर्चा झडत आहेत. पोलिस निरीक्षकांनाच फसविणे म्हणजे चोरावर मोर होणे, तर खाकी वर्दीची चोरी होण्यामागे काहीतरी खोडीचा संशय व्यक्त केला जात आहे. घरातून केवळ सरकारी वर्दी आणि बुटच कसे चोरीला जातात, अन्य साहित्याला चोरटे हात का लावत नाहीत, अशीही चर्चा झडत आहे. 

शिवसग्रांम संघटनेचा तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे अनेक प्रकारातून सतत चर्चेत आहेत. फेब्रूवारी महिन्यात कल्याण गाढे व अंकुश दहिफळे या दोन पोलिसांवर वाळूच्या खंडणी मागणीत मध्यस्थी केल्याने गावठी कट्टयाने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा त्याने दाखल केला होता. त्यामुळे या पोलिसांना बडतर्फ व्हावे लागले. तेव्हापासून पोलिस निरीक्षक ओमासे आणि इसारवाडे यांचे सलोख्याचे संबंध होते. त्याची पोलिस ठाण्यात वर्दळ वाढली होती. पोलिसांना त्याची मर्जी राखण्याची वेळ आली होती.

गत आठवड्यापासून ओमासे व इसारवाडे यांच्यात जुगलबंदी सुरु झाली आहे. खुद्द ओमासे यांनी आ. विनायक मेटे यांचा नातेवाईक असल्याचे भासवूणन देवस्थान भूमिपूजन, कर्जभरणा, शेतमजूर, आंब्यांची रोपे, शेतीकाम व इसारवाडे यांची पत्नी आ. मेटे यांनी मानलेली मुलगी असल्याने त्यांना देण्यासाठी पैसे हवेत, असे सांगत इसरवाडे याने आपली सव्वासहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद इसारवाडे याच्याविरुद्ध दिली आहे. ही रक्कम  शहरातील तीन व्यक्तींकडून घेतल्याचे नमुद केले आहे. त्यानंतर इसारवाडे याच्या विरुद्ध नान्नज ता. जामखेड येथील महेंद्र मोहळकर यांनी 2 लाख रुपयांची, तर मुंगी येथील अंकुश कराड यांनी सव्वादोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

लगोलग पोलिस निरीक्षक यांची वर्दी चोरीला गेली. हा गुन्हा दाखल झाल्याने सर्वानाच हास्यास्पद आश्चर्य वाटले. दरम्यान, इसारवाडे यांच्या पत्नीने माझे पती व ओमासे यांचे मैत्रीचे संबंध असल्याने त्यांच्या घरी येणे-जाणे होते, यासह अनेक गंभीर आरोप केले.  पतीच्या कानाला पिस्टल लावल्याची तक्रार केली. पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणीही पोलिस अधीक्षकांकडे केली.  मात्र, या प्रकाराने खाकी वर्दीची इभ्रत चव्हाट्यावर मांडली गेली आहे.