Thu, Oct 17, 2019 20:48होमपेज › Ahamadnagar › स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचा मोर्चा

स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचा मोर्चा

Published On: Sep 18 2019 1:42AM | Last Updated: Sep 18 2019 12:07AM
नगर : प्रतिनिधी
महापरीक्षा पोर्टल बंद करून, सर्व परीक्षा राज्य लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पद्धतीने घेण्यात याव्यात, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या  विद्यार्थ्यांनी प्रहार जनशक्तीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर जोरदार निदर्शने करीत आक्रोश व्यक्त केला.  

स्पर्धा परीक्षेची रात्रंदिवस तयारी करून, विद्यार्थ्यांवर महापरीक्षा पोर्टल मार्फत होणार्‍या गैरकारभारामुळे मोठा अन्याय होत आहे. शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची भरती करताना विद्यार्थ्यांची थेट राज्य लाोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जावी. यासाठी वेळोवेळी आंदोलने करून देखील राज्य शासन यांची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ  प्रहार जनशक्तीच्या  वतीने काल (दि.17) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात काढण्यात आला. त्यानंतर जोरदार निदर्शने करण्यात आली. 

पोलिस भरतीच्या 15 हजार जागा वाढवून पारंपारिक पारदर्शक पद्धतीने भरती घेण्यात यावी. मेगा भरतीच्या सर्व जागा पारदर्शक केंद्रीय पद्धतीने राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात याव्यात. आतापर्यंत झालेल्या महापरीक्षा पोर्टलच्या गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करून, दोषींवर योग्य ती कारवाई त्वरित करण्यात यावी, आदी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. 

या मोर्चात प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, अजय बारस्कर, अश्विनी लोंढे, मनीषा खिळे, पल्लवी दळवी, देविदास खुरांगे, रूपाली खरमाळे, दीपाली धायगुडे आदींसह स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.