Mon, Aug 10, 2020 05:05होमपेज › Ahamadnagar › दोन अपघातांत ६ तरुण ठार

दोन अपघातांत ६ तरुण ठार

Last Updated: Oct 11 2019 1:50AM
पारनेर / संगमनेर : प्रतिनिधी     
कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या दोन भीषण अपघातांत सहा तरुणांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाले. यातील पहिला अपघात नगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात झाला. तर दुसरा अपघात संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय  महामार्गावर कर्‍हे घाटात झाला.

नगर-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात संदीप किसन पवार (वय 42), भरत भाऊसाहेब नन्नवरे (वय 22, दोघेही रा. सुपे, ता. पारनेर) व श्रीकांत गजानन गायकवाड (वय 24, मूळ रा. चिंचोंडी पाटील, ता. नगर, हल्ली रा. सुपे) यांचा मृत्यू झाला. तर साहिल समदखान पठाण (वय 22) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयातून पुणे येथे हलविण्यात आले आहे. 

तर दुसर्‍या अपघातात गणेश सुकदेव दराडे (वय 29, रा. कर्‍हे, ता. संगमनेर), श्रीकांत बबन आव्हाड (वय 28, रा. दरेवाडी, हल्ली मु. सिन्नर) व अजय श्रीधर पेंदाम (वय 27, रा. नागबीड, जि. चंद्रपूर) अशा तिघांचा मृत्यू झाला. 

नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात झालेल्या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, सुपे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असलेले संदीप पवार हे बुधवारी (दि.9) भरत नन्नवरे, श्रीकांत गायकवाड व साहिल पठाण यांच्यासमवेत स्विफ्ट कारमधून नगरहून सुप्याकडे येत होते. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास चास शिवारात फलके फार्मसमोर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला कारने जोराची धडक दिली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संदीप पवार व भरत नन्नवरे हे दोघे जागीच मृत झाले होते. तर श्रीकांत गायकवाड व साहिल पठाण हे दोघे गंंभीर जखमी होते. दोघा जखमींना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. दरम्यान, श्रीकांत गायकवाड यांचे रस्त्यातच निधन झाले. साहिल पठाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना नगरहून पुणे येथे हलविण्यात आले आहे. 

संदीप पवार, भरत नन्नवरे व श्रीकांत गायकवाड यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पवार यांच्यावर पवारवाडी येथे, भरत नन्नवरे यांच्यावर सुपे येथे, तर श्रीकांत गायकवाड यांच्यावर चिचोंडी पाटील येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय  महामार्गावर कर्‍हे घाटात झालेल्या  अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे गणेश दराडे, श्रीकांत आव्हाड व अजय पेंदाम हे तिघे आपल्या वॉक्सवॅगन कारमधून  (क्र.एमएच.19 - बीजी 8111) सिन्नरहून कर्‍ह्याच्या दिशेने येत होते. यावेळी यूटर्न घेताना कार चालवित असलेल्या गणेश दराडे याला पुढे चाललेल्या मालट्रकचा (क्र. एम एच 12 - केपी 1799) अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांच्या कारची मालट्रकला पाठीमागून जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात कारमधील तिघेही वाहनातच दबले गेले होते.

अपघाताची  माहिती समजताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील, संगमनेर वाहतूक उपशाखेचे सहाय्यक निरीक्षक पप्पू कादरी, कॉन्स्टेबल रफीक पठाण यांनी घटनास्थळी  धाव घेत, अपघातग्रस्त वाहनातून तिघांनाही बाहेर काढले. तोपर्यंत काही नागरिकांनी  रुग्णवाहिकेस बोलावून घेतले. गंभीर जखमी तरुणांना  घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले. पालिकेच्या शव विच्छेदनगृहात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अपघातानंतर  पुणे-नाशिक महामार्गावरकाही काळ ठप्प झालेली वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सुरळीत केली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.