चौथीच्या विद्यार्थिनीवर नराधमाकडून अत्याचार

Last Updated: Dec 18 2019 1:12AM
Responsive image


कोळपेवाडी : वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी घडली. हैदराबाद येथील घटनेच्या जखमा ताज्या असतानाच ही घटना घडल्यामुळे पालक वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपी पसार झाला असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि.13) रोजी नेहमीप्रमाणे दुपारी 4.40 वाजता शाळा सुटली. पीडितेचे वडील शुक्रवारी  बाहेरगावी गेल्यामुळे, त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना मुलीला शाळेतून आणण्यास सांगितले. नातेवाईकांना शाळेत येण्यास थोडा उशीर झाला. त्यांना मुलगी विद्यालयात नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शिक्षकांशी संपर्क साधला असता, शाळा सुटून अर्धा तास झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. शाळा सुटल्यानंतर जेथे थांबते त्या ठिकाणीही मुलगी आढळली नाही. नातेवाईकाने चौकशी करून मुलगी घरी आली की नाही, याची खातरजमा केली. मात्र, मुलगी घरी आली नव्हती. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शाळेत आले. त्यांनी मुलगी मैत्रिणीकडे गेली आहे काय, याची चौकशी केली. परंतु, तिचा शोध लागला नाही.

 मुलीचे अपहरण झाल्याची शंका आल्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. वर्गशिक्षिका अनिता दवंगे यांनी वर्गातील मुलींशी संपर्क साधून मुलीबाबत माहिती घेतली असता, ती निळा शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या गाडीवर बसून गेल्याचे मैत्रिणींकडून समजले. सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगळे फौजफाट्यासह शाळेत आले. त्यांनी शिक्षकांशी चौकशी करून कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये पोलिसांना काहीच निष्पन्न झाले नाही. त्यावेळी त्यांनी शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी ज्या रस्त्याने घरी जाते, त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये कोळपेवाडी-सुरेगाव रस्त्यावरील हॉटेल आनंदच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये निळा शर्ट घातलेल्या व्यक्तीसोबत मोटारसायकलवर मुलगी पुढे बसून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉ. बाळासाहेब जुंधारे व जगदाळे कलेक्शनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ही मुलगी मोतीनगर, सुरेगावच्या दिशेने जातांना आरोपीच्या गाडीवर दिसून आली. त्यानंतर प्रमोद दंडवते यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी शिर्डी-लासलगाव रस्त्याने शहाजापूरकडे जातांना दिसले. नंतर एके ठिकाणी शहारोडकडे गेल्याचे दिसून आले. पोलिस व सर्व शिक्षकांनी रात्रभर तपास करून देखील मुलगी मिळून आली नाही. 

दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि.14) सकाळी मोतीनगर सुरेगाव येथे मुलीच्या नातेवाईकांच्या घरी तिला सोडून देण्यात आले. पोलिसांनी या मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. 

शनिवारी (दि.14) शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे मुलीच्या शोध घेण्यासाठी शहाजापूर शिवारात गेले असता त्यांना शिवाजी बोरसे फार्म हाऊसवर हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (एम एच 41-3033) चावीसह आढळून आली. वाहन क्रमांकावरुन मालकाची ओळख पटल्यानंतर त्यांनी आपली गाडी आरोपी अमोल अशोक निमसे याला दिल्याचे सांगितले. त्यानंतर एक महिलेने माहिती सांगितली की, या फार्म हाऊसमध्ये शाळेचे दप्तर आणि जेवणाचा डबा आहे. सकाळी 6 च्या सुमारास आरोपी व मुलीला जाताना पाहिले. ही माहिती पोलिसांना समजताच पोलिस घटनास्थळी आले. घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे अत्याचाराचे पुरावे आढळून आले. पोलिसांनी आरोपीच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत. हा आरोपी पाथर्डी तालुक्यातील असून, या फार्म हाऊसवर राखणदार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.