Sun, Aug 09, 2020 11:22होमपेज › Ahamadnagar › शाळा बंद संगमनेरात अध्यादेशाची होळी

शाळा बंद संगमनेरात अध्यादेशाची होळी

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:56AM

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

सरकारने शाळा बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या अध्यादेशाची संगमनेरच्या छात्रभारती संघटनेच्या वतीने सह्याद्री महाविद्यालयासमोर होळी करून निषेध करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अध्यादेशाची होळी करणार्‍या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर समज देऊन या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले.  शिक्षणाची खासगीकरणाच्या दिशेने ढकलगाडी करण्याचा प्रयत्न राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा आहे. त्यांनी कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय गोरगरिबांच्या शिक्षणावरती व विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखा आहे. शाळा बंद करून सरकार गोरगरिबांवर अन्याय करीत आहे. यातून सरकारचा खासगीकरणाला प्राधान्य देण्याचा डाव सुरू आहे. शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय गोरगरीब व बहुजन वर्गातील मुलांना घातक असून सर्वांधिक फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे छात्रभारती या निर्णयाच्या विरोधात जाऊन जोपर्यंत शिक्षणमंत्री विनोद तावडे हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत छात्रभारती संघटना मागे हटणार नाही, असा इशारा अनिकेत घुले, प्रमोद मोदड, योगेश शिंदे, रोहित शिंदे, अनिकेत तोरकडी, पंकज दिघे आदींनी दिला आहे. 

सह्याद्री महाविद्यालयाजवळ छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या अध्यादेशाची होळी केल्याची माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंग रजपूत हे पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी गेले. त्यांनी अध्यादेशाची होळी करणार्‍या काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर छात्रभारतीचे रजत अवसक व गोपीनाथ घुले हेही ठाण्यात आले. दरम्यान, आंदोलन एक दिवस करून भागत नाही आणि अशी जाळपोळ करून आंदोलने यशस्वी होत नाही. त्यामुळे शांततेच्या व सनदशीर मार्गाने आंदोलने करावी, असा सल्ला पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी विद्यार्थ्यांना देत समज देऊन सोडून दिले.