Wed, Aug 12, 2020 21:03होमपेज › Ahamadnagar › शेवगावच्या पोलिस निरीक्षकास गंडविले

शेवगावच्या पोलिस निरीक्षकास गंडविले

Published On: Aug 13 2018 1:17AM | Last Updated: Aug 13 2018 12:05AMनगर/शेवगाव : प्रतिनिधी

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांचा मोबाईलवर खोटा आवाज काढून, एकाने शेवगावचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना सुमारे सव्वासहा लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवसंग्रामचा तालुकाध्यक्ष नवनाथ हरिश्चंद्र इसरवाडे (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 फेब्रुवारी ते 5 ऑगस्ट 2018 दरम्यान ही घटना घडली.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, इसरवाडे याने पोलिस निरीक्षक ओमासे यांना शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. मेटे हे आपले नातेवाईक आहेत व त्यांच्या संघटनेचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगितले. तो शिवसंग्रामचे काम पाहत असल्याने ओमासे यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला. त्याने आ. मेटे यांचा मोबाईल क्रमांक म्हणून बनावट नंबर दिला. त्या मोबाईल क्रमांकावरून एक अज्ञात व्यक्ती आ. मेटे यांचा आवाज काढून पोलिस निरीक्षक ओमासे यांच्याशी बोलायचा. मोबाईलवरून बोलणारी व्यक्ती शेती, मदत व कार्यक्रम अशी वेगवेगळी कारणे सांगून, ओमासे यांच्याकडे पैशाची मागणी करायची. ते पैसे नवनाथ इसरवाडे याच्याकडे देण्यास सांगितले जायचे. आपल्याशी आ. मेटे बोलत असल्याचे निरीक्षक ओमासे यांना वाटले. ओमासे व इतर साक्षीदारांनी इसरवाडे याच्याकडे वेळोवेळी 6 लाख 20 हजार रुपये दिले. 

आपण मेटे यांच्याशी बोलत नव्हतो, इसरवाडे याने आपल्याला फसविले असल्याचे लक्षात येताच पोलिस निरीक्षक ओमासे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिवसंग्रामचा तालुकाध्यक्ष नवनाथ इसरवाडे व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मगर हे करीत आहेत. पोलिस निरीक्षकालाच गंडविल्याची घटना उघडकीस आल्याने हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.