Fri, Aug 07, 2020 15:37होमपेज › Ahamadnagar › घोटाळा सिद्ध होऊनही चौकशीचे तुणतुणे!

घोटाळा सिद्ध होऊनही चौकशीचे तुणतुणे!

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 24 2018 1:23AMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळा प्रकरणाची चौकशी मनपास्तरावर पूर्ण होऊन त्यात महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालाच्या प्रतीसह वारंवार मागविण्यात आलेली माहिती तोफखाना पोलिसांना देण्यात आलेली आहे. पुन्हा तीच ती माहिती मागवून पोलिस प्रशासन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे व राजकीय दबावातून प्रक्रियेत वेळकाढूपणा सुरु असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे. मनपा आयुक्तांनीही यावर नाराजी व्यक्त करत पोलिस अधिक्षकांनाच गुन्हा दाखल करण्यासाठी साकडे घातले आहे. फाईल चोरी व खोटी सही करुन फसवणूक करण्यात आल्याची तक्रार मनपाने पोलिस ठाण्यात केलेली आहे. त्यावर पोलिसांनी मनपाला पत्र पाठवून कागदपत्रे व माहिती मागविली होती.

ती मनपाकडून सादर करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच मनपास्तरावरील चौकशी पूर्ण होऊन अहवालात महापालिकेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. यात अधिकार्‍यांची जबाबदारी, त्यांच्या कार्यातील त्रुटींसह दोषारोपही ठेवण्यात आले आहेत. पोलिसांकडून तक्रार अर्जावर चौकशी सुरु असतांनाच मनपा प्रशासनाने या अहवालाची पत्र पोलिसांकडे सादर केली. चौकशी अहवालानुसार ठेकेदारासह दोषींवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, असे पत्रही मनपा आयुक्तांनी दिले आहे. अहवालात प्रशासकीय बाबींची संपूर्ण चौकशी होऊन अनियमितता सिध्द झालेली असतांनाही पोलिस अधिकारी राजकीय दबावाखाली माहिती मागविण्याचे सोपस्कार करुन कारवाई लांबविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. खुद्द आयुक्तांनीही याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तोफखाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश द्यावेत, असे पत्रही आयुक्तांनी काल (दि.23) पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांना दिले आहे.

दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वी तोफखाना पोलिसांनी मनपाला माहिती मागविण्याबाबत दिलेल्या पत्रामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. चौकशी अहवालात ज्या बाबींची तपासणी करण्यात आली, त्यावर निष्कर्ष काढून दोष निश्‍चित करण्यात आले, कारवाईची शिफारस करुन महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले, त्याच मुद्द्यांवरील माहिती पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली पुन्हा मागविल्यामुळे पोलिसांना मनपाच्या चौकशी अहवालावर विश्‍वास नाही का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. पथदिवे घोटाळ्याप्रकरणी कारवाईसाठी दिवसेंदिवस वाढत असलेल्या दबावामुळे आता खुद्द आयुक्तांनीच पोलिस अधिक्षकांचे लक्ष वेधून त्यांना साकडे घातले आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षक याची दखल घेणार का? याकडे लक्ष लागले आहे.