Sun, Aug 09, 2020 11:55होमपेज › Ahamadnagar › शहर अभियंत्यास महापालिकेत दमदाटी

शहर अभियंत्यास महापालिकेत दमदाटी

Published On: Jan 07 2018 2:00AM | Last Updated: Jan 06 2018 11:48PM

बुकमार्क करा
नगर: प्रतिनिधी

महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत माहिती अधिकारी कार्यकर्त्याने प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. काल (दि. 6) दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रमोद मोहोळे याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी मोहोळे हा सर्जेपुरातील एक पुतळा रस्त्यावरून हटविण्यासंदर्भातील कामाबाबत महापालिकेच्या इमारतीत आला होता. आयुक्तांशी भेटून बाहेर आल्यानंतर त्याने प्रभारी शहर अभियंता विलास गणपत सोनटक्के (वय 54, रा. केडगाव, नगर) यांना अर्वाच्च भाषा वापरण्यास सुरुवात केली.

‘तुम्ही चोर आहात. तुम्ही भ्रष्टाचारी आहात’, असे मोठ्याने बोलून अवमानीत केले. त्यानंतर शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. हा गोंधळ सुरू असताना महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व इतर कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले व मोहोळे यास पकडून ठेवले. त्यानंतर तोफखाना पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी महापालिकेत येऊन मोहोळे यास ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला. महापलिका अधिकारी, कामगार युनियनने पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.