Tue, Aug 11, 2020 22:19होमपेज › Ahamadnagar › कोपर्डी प्रकरणातील तोतया गजाआड

कोपर्डी प्रकरणातील तोतया गजाआड

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 05 2017 12:39AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

किडनीच्या आजारामुळे सतत ‘डायलेसिस’ करावे लागते. त्याच्या खर्चासाठी कुवत नसल्याने तो ‘व्हीआयपी’ व्यक्ती व संवेदनशील प्रकरणात तोतयागिरी करणारे धमकीवजा फोन करतो. अटक केल्यानंतर जामीन नाकारतो. तुरुंगातील कैद्याला मोफत औषधोपचार मिळतात, म्हणून पुण्यातील 21 वर्षांच्या युवकाने ही शक्कल लढविली आहे. कोपर्डी ‘निर्भया’कांड प्रकरणातील आरोपींना येरवडा कारागृहात हलविण्याबाबत कारागृह अधिकार्‍यांना फोन करून तोतयागिरी करणार्‍या आरोपीस अटक केल्यानंतर ही बाब उघडकीस आली, असे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले. 
आरोपी अमित जगन्नाथ कांबळे (21, रा. 256, निंबाळकरवाडा, नवीपेठ, पुणे) यास स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात रविवारी अटक केली.

 दि. 29 नोव्हेंबरला कोपर्डी प्रकरणातील आरोपींबाबत नगरच्या उप-कारागृहातील दूरध्वनीवर कॉल करून मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, पोलिस महासंचालक बोलतोय, एसीपी बोलतोय, असे सांगून आरोपींना पुण्याला हलविण्याबाबतचे तीनवेळा त्याने फोन केले होते. आरोपीने मोबाईलवरून कॉल केलेला असल्याने रविवारी आरोपीचे नाव निष्पन्न झाले व पोलिस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, कर्मचारी फकीर शेख, दत्ता हिंगडे, रवी सोनटक्के, संदीप घोडके, सचिन कोळेकर, नानेकर, देवा काळे हे पथक पुण्यात दाखल झाले. त्यांनी नवीपेठेत सापळा रचून आरोपी कांबळे यास जेरबंद केले. 

त्याची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. त्याचे आई-वडील मयत झालेले असून, तो किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे सतत डायलेसिस करावे लागते. कामधंदा नसल्याने व आजारपणामुळे नोकरी मिळत नसल्याने, त्याने डायलेसिसच्या उपचारासाठी तोतयागिरी करणारे फोन व नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळण्यास सुरुवात केली. कांबळे याने त्याच्या गुन्ह्याची सुरुवात सन 2010 मध्ये केली. पहिला फोन पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांना केला होता. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता बोलत असल्याने सांगून त्यांना दमदाटी, शिवीगाळ केली होती. काही दिवसांपूर्वी अग्निशमन दलास फोन करून पुण्यातील एका पुलावरील वाहतूक बंद केली होती.

नोकरीचे आमिष दाखवून काही युवकांकडून किरकोळ रक्कमही घेतली होती. ‘जस्ट डायल’ व शासकीय कार्यालयांत खोटी नावे सांगून तो व्हीआयपींचे नंबर मिळवत होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर तो जामीन नाकारून कारागृहातच राहत होता. काही दिवसांपूर्वी जामिनावर त्याची सुटका झाली. त्यानंतर वृत्तपत्रांतील बातम्या वाचून कोपर्डी प्रकरणातील आरोपींबाबत नगरच्या सबजेलमध्ये फोन करून तोतयागिरी केली. नगरच्या पोलिस पथकाने चौकशी केली असता, त्याच्याविरुद्ध यापूर्वी पुण्यातील डेक्कन, विश्रामबाग वाडा, फरासखाना, हडपसर या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. 

वेड्याचे रुप घेत व्यवस्थेला काढले वेड्यात! कांबळे याने एका युवतीच्या कागदपत्रांचा वापर करून कोपर्डी प्रकरणातील आरोपींबाबत फोन केले. पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेतला. त्यावेळी पुण्यातील अमित कांबळे याला काही दिवसांपूर्वी नोकरीसाठी कागदपत्रे पाठविल्याचे उघड झाले. पोलिस त्या पत्त्यावर गेले. पोलिसांनी त्याच्याकडे पाहावे, म्हणून तो पोलिस आल्याचा अंदाज येताच पळून जाऊ लागला. त्यामुळे आपोआप पोलिसांचे लक्ष त्याच्याकडे गेले व त्याला पकडले. त्याला पकडल्यावर काही क्षण पोलिसांना दुसर्‍या व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड करून तोतयागिरी करणार्‍याला पकडल्याचा आनंद झाला. परंतु, सर्व हकीकत संपल्यावर त्या आनंदावरच विरजण पडले. औषधोपचारासाठी वेड्याचे रुप घेऊन तो व्यवस्थेलाच वेड्यात काढत आहे.