Wed, Aug 12, 2020 03:06होमपेज › Ahamadnagar › आगामी निवडणुकांतही महाविकास आघाडी

आगामी निवडणुकांतही महाविकास आघाडी

Last Updated: Dec 10 2019 1:23AM
नगर : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आले. येत्या काळात होणार्‍या जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी बँकांच्या निवडणुका  एकत्रितपणे लढवून, या ठिकाणीही महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला जाईल, असे संकेत विधानसभेचे माजी सभापती आ. दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (दि.9) नगरमध्ये दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सहा आमदारांचा सत्कार सोहळा काल येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, आमदार प्राजक्‍त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार नीलेश लंके, आमदार किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अ‍ॅड. शारदा लगड, निर्मला मालपाणी आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आ. वळसे पाटील पुढे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. सरकारची रचना होणे बाकी आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व गोष्टी पूर्ण होतील. मंत्र्यांच्या खाते वाटपाचा निर्णय कोअर कमिटी आणि मुख्यमंत्री घेतील. जिल्हा परिषदच्या पदाधिकार्‍यांच्या कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्याच बरोबर सहकारी बँकांच्या निवडणुकाही आल्या आहेत. महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषद, सहकारी बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आली पाहिजे. नगर महापालिकेची आकडेवारी पाहून पुढील महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. हा केवळ नगरचाच विषय नाही, तर राज्यातील अनेक स्थानिक सवराज्य संस्थांबाबत असाच निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीत याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. त्या निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होईल, असे त्यांनी सांगितले.

विखेविरोधी गट आघाडीसोबत नाही
विधानसभेतील भाजपाच्या काही उमेदवारांच्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या आगामी पदाधिकारी निवडीत भाजपातील विखेविरोधी गट महाविकास आघाडीबरोबर यणार का, असे विचारता तशी शक्यता वळसे पाटील यांनी फेटाळून लावली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष सोडलेला नाही. ते पक्षापासून अलिप्तही झालेले नाहीत. ते पक्षातच पूर्णपणे सक्रिय असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नावर स्पष्ट केले.