Wed, Aug 12, 2020 09:50होमपेज › Ahamadnagar › चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

Published On: Dec 02 2018 1:44AM | Last Updated: Dec 02 2018 1:44AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

बालवाडीत शिकणार्‍या एका सहा वर्षीय चिमुरडीच्या संशयास्पद मृत्यूने श्रीरामपूर तालुक्यात घबराट पसरली आहे. तिचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तालुक्यातील कारेगाव येथे शनिवारी (दि. 1) ही घटना घडली. 

दरम्यान, शारीरिक अत्याचाराच्या शक्यतेने कारेगाव ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या घटनेतील आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास तिच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. परंतु, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने पोलिस यंत्रणा संभ्रमात पडली आहे.  

याबाबत समजलेली माहिती अशी की, कारेगाव येथील कारवाडी जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत शिकणारी 6 वर्षांची चिमुरडी आपल्या बहिणीसमवेत प्रातःविधीसाठी गेली होती. या ठिकाणी असलेल्या बोरीच्या झाडांची बोरे घेऊन त्या चिमुरडीची बहीण घरी परतली. त्यानंतर काही वेळाने सदर मुलगी घरी परतली. घरी आल्यानंतर तिच्या तोंडातून लाळ बाहेर आली व ती जागीच बेशुद्ध पडली. घरी असलेल्या आजीने  परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी तिला कारेगाव येथील खासगी दवाखान्यात नेले. परंतु, ती बेशुद्ध असल्याने तत्काळ श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. कामगार रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी रवींद्र जगधने व त्यांच्या पथकाने तपासणी केली असता, मुलगी मृत असल्याचे निदर्शनास आले. 

मुलीच्या शरीराचा काही भाग सुजलेला दिसला.    

त्यामुळे हा लैंगिक अत्याचार आहे की दुसरे कुठले वैद्यकीय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका विषारी जातीचा सापाने दंश केला, तरीही गुप्तांग सुजते, असे वैद्यकीय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. निश्‍चित निष्कर्ष नसल्याने सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तेथील तपासणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच कामगार हॉस्पिटल येथे मोठा जमाव जमा झाला. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट हे तातडीने कामगार रूग्णालयात दाखल झाले व त्यांनी जमाव पांगवला. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनीही घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार हेही त्यांच्या पथकासह श्रीरामपुरात तळ ठोकून आहेत. 

आमदार भाऊसाहेब कांबळे, पंचायत समिती सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक प्रकाश ढोकणे, रिपाइंचे सुभाष त्रिभुवन आदींनी रुग्णालयात भेट दिली. 

गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. मृत्यूबाबत विविध तर्क वितर्क लढविले जात होते. खून असेल, तर आरोपीचा शोध लावून लवकरात लवकर आरोपीस जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

आज श्रीरामपूर बंदचे आवाहन

कारेगाव येथील मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी विविध संघटनांनी आज श्रीरामपूर बंद ठेवण्याचे आवाहन केलेले आहे. दरम्यान या घटनेबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.