Wed, Aug 12, 2020 02:46होमपेज › Ahamadnagar › जिवंत असेपर्यंत तरी डेपो होईल का?

जिवंत असेपर्यंत तरी डेपो होईल का?

Published On: Dec 19 2017 1:55AM | Last Updated: Dec 18 2017 11:32PM

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

मी जिवंत आहे तो पर्यत तरी आपला एस टी डेपो होईल का रे बाबांनो....अशी विचारणा दुरगाव येथील 85 वर्षाचे वृध्द शेतकरी ज्ञानदेव भगत यांनी केली. त्यांच्यासोबत तालुक्यातील राक्षसवाडी येथील अंकुष काळे हे दुसरे वृध्द शेतकरी होते.

मनसेचे जिल्हा प्रमुख सचिन पोटरे यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी कर्जत बसस्थानकावर आठवडे बाजाराचे औचित्य साधत एस. टी. डेपो व्हावा व माळढोकचे इको झोन अंतर कमी करावे, या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. सुमारे 50 हजार नागरिकांच्या स्वाक्षर्‍यांचे निवदेन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे. या अभियानामध्ये तालुकाध्यक्ष राहुल निंबोरे, रवींद्र सुपेकर, राजू धोतरे, गणेश मराठे, नामदेव थोरात, धरमसिंग परदेशी, अविनाश राऊत, दत्‍ता शिपकुले यांच्यासह अनेक मनसैनिक सहभागी झाले आहेत.

कर्जत बसस्थानकावर या स्वाक्षरी मोहिमीची सुरवात पूजा बाळासाहेब तनपुरे या महाविद्यालयीन विद्यर्थिनीच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वाक्षरी करून या करण्यात आली. आठवडे बाजाराचा दिवस असल्याने कर्जत येथे बाजारात आठवड्याचा किराणा व भाजीपाला घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागामधून मोठया प्रमाणावर शेतकरी, नागरीक व महिला आल्या होत्या. यामध्ये दुरगाव येथील ज्ञानदेव भगत आणि राक्षसवाडी येथील अंकुश काळे हे दोघे शेतकरी आले होते. त्यांनी फलकावर मोडी लिपीमधून स्वाक्षरी केली. 
यावेळी भगत म्हणाले की, बाबा मला कळायला लागल्यापासून कर्जतला एस. टी. डेपो होणार, होणार असे ऐकले आहे. आज माझे वय 85 वर्षे आहे. मात्र डेपो काही झाला नाही. गावात प्रचाराला आले की सगळे नेते डेपो होणार असे सांगत. पण अजुन काही झाला नाही. आता तुम्ही तरूण पोरे पुढे झाले आहात. हे बेस्ट झाले बर का. पण मी जीवंंत आहे तोपर्यंत तरी डेपो होईल का? मला माझ्या डोळयांनी डेपो पहायचाय. सोमवारी बाजाराला येताना त्या एस टी मध्ये बसून यायचे आहे. एवढी इच्छा पूर्ण करा. आजही दुरगावला जाण्यासाठी गाड्या फार नाहीत. फाट्यावरुन पायी जावे लागते. आमचा ह्यो त्रास कधी बंद होईल तो होवो बाबा, अशा शब्दांत या वृध्द शेतकर्‍याने व्यथा मांडली. 

यावेळी राक्षसावाडीचे वृध्द शेतकरी अंकुष काळे म्हणाले की, आमच्या तर गावात दिवसात एकदाच एस. टी. येते. पुन्हा दिवसभर पायीच जावे लागते.  मला तर आपल्याला डेपो होईल असा विश्‍वास राहिला नाही. आमच्या मागे झाला तर कोणास ठावूक, अशी निराषा आणि तितकीच आगतिकता काळे यांनी व्यक्‍त केली. 

पोटरे म्हणाले की, भगत आणि कांबळे या दोन्ही ज्येष्ठांचे विचार हिच तालुक्याची भावना आहे. सत्ताधार्‍यांनी याचा विचार करावा. मुख्यमंत्र्यांना आम्ही 50 हजार नागरिकांचे स्वाक्षरी असलेले मागणीपत्र देणार आहोत. ते पाहिल्यावर त्यांना कदाचित तालुक्यातील शेतकर्‍यांची भावना समजून येईल.