अहमदनगर : विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चोप

Last Updated: Mar 26 2020 2:45PM
Responsive image
विनाकारन फिरणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला.


संगमनेर : पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. संगमनेर शहरातील अत्यंत रहदारीचा असणाऱ्या रस्त्यावर अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी संगमनेरकर रस्त्यावर फिरताना दिसत होते. मात्र जे रिकामटेकडे विना कामाचे रस्त्यावरून इकडून तिकडे घिरट्या घालतात अशा अनेक टवाळखोरांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

वाचा :नगरमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण

कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यात कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉक डाऊन  करण्याची घोषणा केली. त्यानंतर अत्यावश्यक सेवेच्या असणाऱ्या दुकानांना सुद्धा ठराविक वेळ करून देण्यात आली आहे. या वेळेच्या व्यतिरिक्त दुकाने चालविणार्‍यांवर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

वाचा :वेल्ह्यात ९६ जण होम क्वारंटाईन

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहणांना लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे पाच ते सकाळी नऊ या चार तासाच्या कालावधीतच पेट्रोल पंप चालू ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे संगमनेरच्या रस्त्यावर अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी फिरणारे नागरिक सोडून दुसरे कोणी फारसे फिरताना दिसत नाहीत. परंतु अत्यावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली काही रिकामटेकडे आणि टवाळखोर तरुण मोटारसायकलवरून इकडून तिकडे, तिकडून इकडे घिरट्या घालत आहे. अशा अनेक तरुणांना  पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. त्यामुळे रस्त्यावर न फिरलेले बरे कारण फिरले पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागतो. त्यामुळे दुपारनंतर रस्त्यावर फारसे कोणी फिरताना दिसत नाही.

सर्वाधिक वर्दळीच्या असणाऱ्या नवीन नगर रोड वरील बस स्थानक, दिल्ली नाका, तीन बत्ती चौक, जोर्वे नाका, रायतेवाडी फाटा, ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची महामार्ग पोलिसांकडून आणि आर एस पी च्या शिक्षकांकडून कसून चौकशी केली जात आहे. 

वाचा :विनाकारण घराबाहेर पडू नका