Mon, Sep 21, 2020 17:34होमपेज › Ahamadnagar › संगमनेरला पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्‍त

संगमनेरला पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्‍त

Last Updated: Feb 15 2020 12:52AM
श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर खुर्द शिवारात रायतेवाडी फाट्यावर एका गाडीतून देशी बनावटीच्या पिस्तुलासह 38 जिवंत काडतुसे, असा 5 लाख 80 हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तिघा जणांना गजाआड करण्यात आले आहे.

दिलीप कोंडीबा खाडे (वय28, रा. म्हस्के बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे), बाबाजी बबन मुंजाळ ( वय 27, रा. डोंगरगाव, ता. शिरूर, जि. पुणे) व दयानंद मारुती तेलंग (वय 30, रा. टाकळी हाजी, ता.शिरूर जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी (दि.13) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोपरगावहून  संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने एका मोटारीतून काही संशयित शस्त्रास्त्रे घेऊन   जात असल्याची गुप्त  खबर पोलिस निरीक्षक अभय परमार यांना समजली. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित यांना कळविली. तसेच सहाय्यकपालिस निरीक्षक नरेंद्र  साबळे, उपनिरीक्षक संजय कवडे, पोलिस नाईक विजय पवार, कॉन्स्टेबल सुभाष बोडके, अमृता आढाव, प्रमोद गाडेकर, साईनाथ तळेकर आदींच्या पथकाला संगमनेर खुर्द शिवारात रायतेवाडी फाट्याजवळ सापळा लावण्याचे आदेश दिले.

रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगाची  स्कॉर्पिओ (क्र. एम एच 14 ए व्ही 3600) संगमनेरहून पुण्याच्या दिशेने येत असल्याचे पोलिस पथकाला दिसताच सहाय्यक निरीक्षक साबळे यांनी वाहनाला थांबविले. वाहन थांबताच  साबळे व उपनिरीक्षक कवडे यांनी आपले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर वाहनातील इसमांवर रोखून धरत त्यांना खाली उतरण्यास सांगितले. हा सर्व प्रकार सुरु असताना महामार्गावरुन  येणार्‍या जाणार्‍या  वाहन चालकांच्या  हृदयाचे ठोके चुकले होते. पोलिसांनी वाहनातील इसमांना त्यांची ओळख विचारली असता, त्यांनी आपली नावे दिलीप कोंडीबा खाडे, बाबाजी बबन मुंजाळ  व दयानंद मारुती तेलंग सर्व (रा. शिरूर जि. पुणे) असे  सांगितले.

पोलिसांनी या तिघांही जणांना त्यांच्या वाहनापासून बाजूला नेत त्यांची अंगझडती घेतली. त्यात पोलिसांना त्यांच्याकडे मोबाईल  सोडून काहीही गैर वस्तू सापडली  नाही. मात्र, पोलिसांनी स्कार्पिओची  तपासणी केली  असता, वाहन चालकाच्या आसनाखाली एक गावठी कट्टा, त्याचे मॅगझिन व त्यात पाच काडतुसे, तसेच स्वतंत्र प्लॅस्टिकच्या पिशवीत 33 अतिरिक्‍त काडतुसे आढळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करत तिघांना पकडून पोलिस ठाण्यात आणले.

पोलिस नाईक विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या तिघांच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. त्या तिघा जणांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 "