Wed, Aug 12, 2020 21:03होमपेज › Ahamadnagar › भरतीसाठी बोगस प्रतिज्ञापत्र

भरतीसाठी बोगस प्रतिज्ञापत्र

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:43PMनगर : प्रतिनिधी

अनुकंपा तत्त्वावर कुटुंबातील एक जण पोलिस खात्यात भरती झालेला असतानाही दुसर्‍याला भरती करण्यासाठी बोगस प्रतिज्ञापत्र तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलसह त्याच्या कुटुंबातील एकूण 5 जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये झुंबरबाई केशव शिंदे, राहुल भारत शिंदे, कुणाल भारत शिंदे, अनिशा भारत शिंदे, आशा भारत शिंदे (सर्व रा. केडगाव, नगर) यांचा समावेश आहे. 28 डिसेंबर 2017 रोजी तहसील कार्यालयात हे प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले होते. याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागाचे प्रमुख लिपिक संजय मारुती नागरगोजे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई भरती 2018 मध्ये अनुकंपा तत्त्वावर पोलिस शिपाई म्हणून भरती होण्यासाठी कुणाल शिंदे याने अर्ज केला होता. त्याचा भाऊ राहुल शिंदे हा यापूर्वीच भरती झालेला होता. तरीही आशा शिंदे यांनी तहसील कार्यालयात कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमोर खोटे प्रतिज्ञापत्र तयार केला. त्यातील मजकूर जाणीवपूर्वक खोटा टाकला होता. कुणाल याला पोलिस अधीक्षक कार्यालयात कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले असता प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचे लक्षात आले. त्यावरून आस्थापना विभागातील प्रमुख लिपिक संजय नागरगोजे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पाच जणांविरुद्ध बनावट दस्ताऐवज तयार करून पोलिस अधीक्षक कार्यालय व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत.