Tue, Aug 11, 2020 20:52होमपेज › Ahamadnagar › ‘माईक’मध्ये आवाज ‘अहमदनगर’चा

‘माईक’मध्ये आवाज ‘अहमदनगर’चा

Published On: Dec 18 2017 2:27AM | Last Updated: Dec 18 2017 12:36AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत अहमदनगरच्या न्यू आर्ट, सायन्स, कॉमर्स महाविद्यालयातर्फे सादर झालेल्या ‘माईक’ या एकांकिकेने बाजी मारत पुरुषोत्तम करंडक प्राप्त केला. समाजामध्ये वावरणार्या दोन गटांवर (जाती व्यवस्थेत भेदभाव करून स्वतःची पोळी भाजणारे आणि भेदभाव न करता एकजुटीने राहणारे) एकांकिकेच्या कथानकामध्ये भाष्य केले आहे. याच महाविद्यालयाने पुण्यातून अंतिम फेरीत सुद्धा पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले होते.

त्याशिवाय, सांगली येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातर्फे सादर झालेली ‘देवभाबडी’ या एकांकिकेने सांघिक द्वितीय पारितोषिक आणि मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सादर झालेल्या ‘ए. एस. एल. प्लीज’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक प्राप्त केले. तसेच जळगाव येथील नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातर्फे सादर झालेल्या ‘एक्स’ या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे पारितोषिक प्राप्त केले.

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 15 ते 17 डिसेंबर रोजी पार पडली. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यासह कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, जळगाव अशा एकूण 5 केंद्रावर पार पडली. त्यातील प्रथम तीन आणि प्रायोगिक पारितोषिक प्राप्त एकूण 17 एकांकिकांची निवड झाली महाअंतिम करीता झाली. त्याचा निकाल आणि बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी मिलिंद मराठे, शशिकांत वडोदकर (जळगाव), अविनाश नवाथे, निखिल आगटे उपस्थित होते.

सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक ऐश्‍वर्या पंडित (देवभाबळी, भूमिका लखुबाई) हिने प्राप्त केले. तसेच, अभिनय नेपुण्य पारितोषिक (पुरुष) महेश गुरव (हिआरेथ, भूमिका सायफर) आणि (स्त्री) प्रांजली किन्नरमठ (विवर, भूमिका हिना) हिने प्राप्त केले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक कृष्णा वाळके (माईक) याने प्राप्त केले. या महाअंतिम फेरीत परीक्षक म्हणून डॉ. बाळकृष्ण दामले, अश्‍विनी गिरी आणि विद्याधर जोशी यांनी काम पाहिले.