Sun, Aug 09, 2020 11:15होमपेज › Ahamadnagar › प्लॅस्टिक बुके वापरल्याने ‘रेव्हेन्यू’ला ठोठावला पाच हजारांचा दंड

जिल्हाधिकार्‍यांचे स्वागत पडले महागात

Published On: Jul 02 2018 1:41AM | Last Updated: Jul 01 2018 11:13PMनगर : प्रतिनिधी

प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी जोरदार सुरु असतानाच स्वत:च्या स्वागतासाठी आणलेल्या पुष्पगुच्छाला प्लॅस्टिकचा कागद असल्याचे लक्षात येताच महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी ते स्वत:च पदसिध्द अध्यक्ष असलेल्या रेव्हेन्यू सोसायटीला पाच हजारांचा दंड जागेवरच ठोठावला.

निमित्त होते, शतकी वाटचाल करणार्‍या रेव्हेन्यू सोसायटीच्या 97 व्या सर्वसाधारण सभेचे. काल (दि.1) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभा जोमात सुरु असतानाच सोसायटीचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी सभास्थानी आले. सोसायटीचे चेअरमन राजाराम माने व इतर संचालक त्यांचे स्वागत करण्यासाठी सरसावले. जिल्हाधिकारी व्दिवेदी यांना पुष्पगुच्छ देऊ लागताच, त्यांचे लक्ष पुष्पगुच्छाकडे गेले. पुष्पगुच्छाला प्लॅस्टिकचे आवरण होते. त्यांनी पुष्पगुच्छ नाकारत, प्लॅस्टिक बंदीचा निर्णय तुमच्यापर्यंत आला नाही का, असे विचारले. त्यावर सर्वच संचालक व सभासद कावरेबावरे झाले. पॅस्टिक बंदीचे उल्लंघन केले म्हणून त्यांनी तात्काळ पाच हजार रुपयांचा दंड भरा, असे फर्मान सोडले. 

कावरेबावरे झालेल्या संचालक व सभासदांनी नंतर टाळ्या वाजवून जिल्हाधिकारी तथा या सोसायटीचे पदसिध्द अध्यक्ष व्दिवेदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले. या सभेला अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपविभागीय अधिकारी   उज्ज्वला गाडेकर आदींसह सोसायटीचे चेअरमन राजाराम गायकवाड, व्हा. चेेअरमन ज्योती अकोलकर, नवनाथ दाते यांच्यासह सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोसायटीचे काम उत्तम असून, सभासदांना जास्तीत जास्त लाभ द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी केले. संचालक राजेंद्र आंधळे यांनी प्रस्ताविक केले. चेअरमन राजाराम गायकवाड यांनी आभार मानले. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी ठोठावलेला दंड संस्थेने न भरता तो सभासदांनी वर्गणी करुन भरण्याचा निर्णय सभेमध्ये घेण्यात आला.