Wed, Apr 01, 2020 00:42होमपेज › Ahamadnagar › कर निरीक्षकासह दोघे अटकेत

कर निरीक्षकासह दोघे अटकेत

Last Updated: Jan 22 2020 2:09AM
नगर ः प्रतिनिधी

दंड न भरता जीएसटी खाते बंद करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी करनिरीक्षक व कर सल्लागारास (खासगी व्यक्ती) अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर विभागाने जीएसटी कार्यालय व जुन्नर तालुक्यातील बेल्हा येथे मंगळवारी (दि. 21) ही कारवाई केली.

अटक केलेल्यांमध्ये वस्तू व सेवाकर विभागातील निरीक्षक विशाल सुखदेव भोर (वय 34 वर्षे, रा. साईनगर, भूषणनगर, केडगाव, नगर), कर सल्लागार निलेश म्हातारबा बांगर (वय 28 वर्षे, रा. रानमळा, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तक्रारदाराच्या कृषी सेवा केंद्राचे जीएसटी खाते होते. परंतु मागील दोन वर्षांपासून त्यांचा व्यवसाय बंद होता. त्यांना आकारण्यात आलेला दंड 1 लाख 13 हजार रुपये न भरता त्यांचे जीएसटी खाते बंद करण्यासाठी कर निरीक्षकाने लाच मागितली होती.

त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. सोमवारी जीएसटी कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. कर निरीक्षकाने पंचासमक्ष 20 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 15 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम कर सल्लागार बांगर याच्याकडे देण्यास सांगितले. 

मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील बांगर असोशिएटस या कार्यालयात 15 हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताना निलेश बांगर यास रंगेहाथ पकडले. कर निरीक्षक भोर यास वस्तू व सेवा कर कार्यालय येथून ताब्यात घेतले आहे. पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक दीपक करांडे, शाम पवरे, पोलिस कर्मचारी तन्वीर शेख, रमेश चौधरी, प्रशांत जाधव, विजय गांगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, अशोक रक्ताटे, हारुण शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.