Sat, Jul 11, 2020 09:35होमपेज › Ahamadnagar › वाळूतस्करांची पिकअप उलटून तीन ठार

वाळूतस्करांची पिकअप उलटून तीन ठार

Last Updated: Jul 02 2020 7:54AM
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा

वाळू तस्करी करणारे टाटा  पिकअप हे वाहन निळवंडे धरणाचे काम  सुरू असणार्‍या 21 फूट  डाव्या कालव्याच्या खड्ड्यात  कोसळून उलटले. या  भीषण अपघातात  तीन जण गाडीखाली दबून जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी   झाला आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील खंडोबा मंदिराजवळ रविवारी (दि.28) पहाटेच्या समारास ही घटना घडली.

प्रवीण भैय्यासाहेब सय्यद (वय 30, रा. संगमनेर खुर्द), विठ्ठल मुरलीधर बर्डे (वय 30, रा. कोंची) व सुरेश संतोष माळी (वय 45, रा. मांची) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर अक्षय रावसाहेब माळी  (वय 20,  रा. मांची) असे जखमींचे नाव आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर येथून रात्रीच्या वेळी टाटा 207 या पिकअपमध्ये (क्र.एमएच 14 एएच 1073) वाघापूर शिवारातील वाटीचा डोह परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीररित्या  वाळू भरून  हिवरगाव पावसा फाटा मार्गे निमगाव टेंभीकडे हे तिघे जात होते. हिवरगाव पावसा शिवारातील  खंडोबा मंदिराजवळ  हे वाहन आले असता,  चालकास पुढे  कालव्याचा खड्डा दिसला नाही. त्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि  गाडी  थेट 20 ते 25 फूट निळवंडे कालव्याच्या खड्ड्यात कोसळून पलटी झाली. या अपघातात वाहनचालक व दोन मजूर, अशा तिघांचा वाहनाखाली दबून जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर झाला आहे.

अपघाताची ही घटना  रविवारी सकाळपर्यंत कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, काही वेळानंतर रस्त्याने जाणार्‍या-येणार्‍यांच्या   हा अपघात निदर्शनास आला.  त्यानंतर ही वार्ता वार्‍याप्रमाणे सर्वत्र पसरली. त्यानंतर पोलिसांसह हिवरगाव पावसाचे ग्रामस्थ  घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक  रोशन पंडित, पोलिस निरीक्षक सुनील पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गाडीखाली दबलेल्या  तिघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, तिघेही मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.  तर जखमीला  खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले  आहे.