Wed, Aug 12, 2020 08:18होमपेज › Ahamadnagar › एकाच संपत्तीवर तीन कर्ज प्रकरणे

एकाच संपत्तीवर तीन कर्ज प्रकरणे

Published On: Oct 04 2018 1:42AM | Last Updated: Oct 04 2018 12:16AMनगर : गणेश शेंडगे

शहर सहकारी बँकेने सन 2014 रोजी डॉ. नीलेश शेळकेशी संबंधित असलेल्या एकाच संपत्तीवर तीन कर्ज प्रकरणे मंजूर केली. 8 कोटी 57 लाख रुपयांच्या संपत्तीवर तिघांना 13 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार सहकार खात्याने केलेल्या चौकशीतून निष्पन्न झालेला आहे. 

डॉ. शेळके याने शहर बँकेचे संचालक मंडळ, वैद्यकीय मशिनरी डिलरला हाताशी धरून तीन भागीदार डॉक्टरांची 17 कोटी 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेची कर्ज प्रकरणे चांगलीच चर्चेत आली आहेत. गुन्हा दाखल होण्याच्या पंधरा दिवस अगोदरच सहकार खात्याची चौकशी पूर्ण झालेली आहे. त्या अहवालात डॉ. शेळके यांच्याशी संबंधित 18 कर्ज प्रकरणांबाबत सहकारी खात्याने संशय व्यक्त केला आहे. त्यानंतरच कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या चौकशीनुसार डॉ. शेळकेशी संबंधित कर्ज देताना बँकेचे संचालक मंडळ व अधिकार्‍यांनी तारण प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे दिसून येते. डॉ. उज्ज्वला कवडे यांचा कर्ज मागणी अर्ज 19 मार्च 2014 रोजी बँकेकडे प्राप्त झालेला आहे. त्या कर्जासाठी 26 मार्च रोजी डॉ. शेळकेंसह तिघांची जागा गहाणखत करून घेतलेली आहे. 19 मार्च रोजी मागणी केलेल्या कर्जाच्या जागेचा बँकेने 1 मार्च 2014 रोजीच सर्च रिपोर्ट घेतलेला आहे. तसेच कर्जाची मागणी करण्याच्या सुमारे एक महिना अगोदरच 13 फेब्रुवारी 2014 रोजी जागेचे मूल्यांकन करून दिलेले आहे. त्या जागेचे बाजारमूल्य 8 कोटी 57 लाख रुपये आहे. त्या जागेवर दोघांना प्रत्येकी 5 कोटी 75 लाख, एकाला दीड कोटी, असे एकूण 13 कोटींचे कर्ज देण्यात आलेले आहे. म्हणजे त्या संपत्तीवरील एकूण कर्ज रकमेपेक्षा 4 कोटी 43 लाख रुपयांचे अपुरे तारण बँकेने घेतलेले आहे, असे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

कर्जाची मागणी करण्याअगोदरच जागेचे मूल्यांकन, सर्च रिपोर्ट करणे, एकाच संपत्तीवर त्याच्या एकूण मूल्यापेक्षा जास्त रकमेची तीन कर्ज प्रकरणे मंजूर करणे, आदी बाबी कर्ज प्रक्रिया व त्याच्या वापराबाबत संशय निर्माण करणारे आहे, असे मत चौकशी अधिकार्‍यांनी नोंदविलेले आहे. बँकेने कर्ज वसुलीसाठी वेळीच कायदेशीर कारवाई केलेली नाही. कर्ज खाते ‘एनपीए’मध्ये गेल्यानंतर जवळपास दीड वर्षांच्या विलंबाने बँकेने कर्जदार व जामिनदारांना वसुलीसाठी पत्रे दिलेली आहेत. शेळकेच्या संबंधित कर्जापोटी तारण दिलेल्या मालमत्तेवर सहकार खात्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत बोजा नोंद नसल्याचे आढळून आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे.

..म्हणून बँक संशयाच्या फेर्‍यात!

एकाच संपत्तीवर जास्त रकमेची कर्ज प्रकरणे मंजूर करणे, कर्ज मागणी अर्जाच्या अगोदरच त्या कर्जासाठी दिलेल्या जाणार्‍या तारण जागेचे मूल्यांकन व सर्च रिपोर्ट असणे, कर्ज खाते ‘एनपीए’त गेल्यानंतर दीड वर्षांनी वसुलीच्या नोटिसा देणे, तारण मालमत्तेवर बोजा नोंद नसणे, काही डॉक्टरांचे वैद्यकीय व्यवसाय प्रमाणपत्र कर्ज प्रकरणासोबत नसणे आदी बाबी आक्षेपार्ह असतानाही कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याने बँकेसे संचालक मंडळ व अधिकारी संशयाच्या फेर्‍यात अडकले आहेत.