होमपेज › Ahamadnagar › ‘एसआयटी’चे प्रमुख बदलले

‘एसआयटी’चे प्रमुख बदलले

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 10:59PMनगर : प्रतिनिधी

केडगाव हत्याकांडाच्या तपासासाठी नियुक्‍त करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख रोहिदास पवार यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी मालेगाव येथील अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल (दि.15) कोतकर व ठुबे कुटुंबियांशी फोनवरुन चर्चा करत माहिती दिल्यानंतर शिवसेना उपनेते अनिल राठोड व प्रभारी पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले. दरम्यान, कोतकर व ठुबे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शिवसेनेचा पाठपुरावा सुरुच राहील. वेळ पडल्यास पुन्हा उपोषण अथवा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अनिल राठोड यांनी यावेळी दिला.

मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबातील संग्राम कोतकर, प्रमोद ठुबे, सुनिता कोतकर, अनिता ठुबे यांनी पोलिस तपासावर आक्षेप घेत उपोषण सुरु केले होते. गृहराज्य मंत्र्यांनी मध्यस्थी करुन एसआयटी प्रमुख रोहिदास पवार यांना हटविल्यानंतर काल चौथ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले. अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक घनश्याम पाटील यांनीही उपोषणकर्ते व शिवसेना पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन पोद्दार यांच्या नियुक्‍तीची माहिती दिली. अनिल राठोड यांनी फिर्यादीत नावे असलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मात्र, ठोस पुरावे असल्याशिवाय कारवाई करता येत नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

अनिल राठोड म्हणाले की, पोलिसांनी नियुक्‍ती केलेल्या एसआयटीकडून योग्य तपास होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, पथकातील अधिकार्‍यांना या गुन्ह्याचे गांभीर्यच कळाले नाही. त्यामुळे आम्ही ना. केसरकर यांच्याशी चर्चा करून त्यांना ही माहिती दिली. त्यांनी जिल्ह्याबाहेरील अधिकार्‍याची नियुक्‍ती करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर व नवीन अधिकारी नियुक्‍त झाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. शिवसेना कोतकर व ठुबे कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील. आज उपोषण मागे घेतले असले तरी वेळ पडल्यास पुन्हा उपोषण अथवा आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी भानुदास कोतकर याच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर ताब्यात घेण्याची मागणी केली. या फुटेमधून आरोपींनी कट रचल्याचे स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृह नेते गणेश कवडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, नगरसेवक योगीराज गाडे, विशाल वालकर आदी उपस्थित होते. दरम्यान, एसआयटीचे नवे प्रमुख हर्ष पोद्दार हे नगरकडे रवाना झाले असून, सायंकाळीच ते तपासाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे घनश्याम पाटील यांनी स्पष्ट केले.

अनिता ठुबे यांची प्रकृती खालावली!

गेले चार दिवस सुरू असलेल्या उपोषणामुळे मयत वसंत ठुबे यांची पत्नी अनिता ठुबे यांची प्रकृती काल खालावली. जिल्हा रुग्णालयाच्या पथकातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आले होते.