Mon, Aug 10, 2020 04:23होमपेज › Ahamadnagar › वडनेर हवेलीत चोरट्यांचा धुमाकूळ

वडनेर हवेलीत चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Jul 08 2019 1:37AM | Last Updated: Jul 08 2019 12:51AM
पारनेर : प्रतिनिधी    
तालुक्यातील वडनेर हवेली येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी सहा घरे फोडून धुमाकूळ घातला. सहापैकी एका घरातील एक तोळा सोने सहा हजार रोख असा 25 हजार 800 रुपयांचा ऐवज घेऊन पसार होण्यात चोरटे यशस्वी झाले. चाहूल लागल्याने ग्रामस्थ जागे झाले. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर चोरट्यांनी गावातून पळ काढला. तालुक्यातील कान्हूरपठार, वेसदरे, कळस, पिंपळगावतुर्क, डिकसळ येथे झालेल्या चोर्‍या ताज्या असतानाच वडनेर हवेली येथेही चोरटयांची धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत असताना 7 ते 8 चोरट्यांनी वडनेर हवेलीमध्ये प्रवेश केला. ज्या घरांना कुलपे आहेत अशी घरे फोडण्यास त्यांनी सुरुवात केली. रामकृष्ण भालेकर हे कामानिमीत्त कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची उचकापाचक करून त्यातील 1 तोळा सोने व 6 हजार रुपये रोख असा एकूण 25 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. घरात इतरत्र असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने मात्र हाती लागले नाहीत.

दरम्यानच्या काळात बाजीराव राजाराम भालेकर, रमेश रमाजी भालेकर, रामदास बन्सी भालेकर, नंदू तुकाराम केदारे, विकास गंगाराम गाडे यांच्या घरांमध्येही चोर्‍यांचा प्रयत्न झाला. या घरांची कुलपे तोडून उचकापाचक करण्यात आली, परंतु तेथे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना ग्रामस्थांना त्याची चाहूल लागली. इतर ग्रामस्थांना सतर्क करून त्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर चोरट्यांनी गावातून पळ काढला. सुपे पोलिसांशी संपर्क करण्यात आल्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पोलिस तेथे दाखल झाले. रविवारी सकाळी चोरीचा पंचनामा करण्यात येऊन गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मोठा ऐवज वाचला 

कामानिमीत्त कुटूंबासह बाहेरगावी गेलेल्या रामकृष्ण भालेकर यांच्या घरातील 25 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीस गेला. त्यांनी गादीमध्ये गुंडाळून ठेवलेले 50 हजार रुपये रोख गुंडाळलेल्या गादीत तर सहा तोळे दागिने बाहेरगावी जायचे असल्याचे इतरत्र दडवून ठेवले होते. हा ऐवज मात्र चोरट्यांच्या हाती न लागल्याने भालेकर यांच्या मोठ्या ऐवजाची चोरी मात्र टळली.