Mon, Aug 10, 2020 05:34होमपेज › Ahamadnagar › शिवशाही बससेवेला घरघर

शिवशाही बससेवेला घरघर

Published On: Sep 02 2019 1:29AM | Last Updated: Sep 02 2019 12:17AM
पुणे :  निमिष गोखले

मोठा गाजावाजा करत 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वातानुकूलित शिवशाही बससेवेला आता घरघर लागली आहे. आधीच आर्थिक तोट्यात असलेल्या शिवशाहीच्या नावावर आठवड्याला सरासरी एका मोठ्या अपघाताची नोंद होत आहे.  

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ तीनच दिवसांपूर्वी (30 ऑगस्ट) शिवशाही बस ट्रकला धडकून 2 प्रवासी ठार, तर 11 गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर शिवशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. गेल्या दोन वर्षांत राज्यात शिवशाहीचे तब्बल 530 लहान-मोठे अपघात झालेले असून यांत 50 जणांचा बळी गेला. धक्कादायक बाब म्हणजे, 365 अपघात गंभीर स्वरूपाचे आहेत. 

शिवशाहीचे वाढते अपघात मानवी चुका की तांत्रिक कारणांमुळे होत आहेत, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. निरपराध नागरिकांचे हकनाक जीव जात असून महामंडळाने तातडीने काही उपाययोजना राबवून शिवशाहीचे अपघात कमी कसे होतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुरक्षित प्रवासाकरिता एसटीतून प्रवास करा, या ब्रिदाला शिवशाहीच्या वाढत्या अपघातांमुळे काळिमा फासला जात आहे, असेच सद्यःस्थितीवरून म्हणावे लागेल.

आतापर्यंतचे निवडक अपघात खालीलप्रमाणे :
-7 एप्रिल 2018 : पुणे-नाशिक बस झाडावर आदळली; 2 जखमी.
-1 मे 2018 : लातूर-औरंगाबाद बस  उलटली; 1 ठार, 6 जखमी.
-9 मे 2018 : बोरिवली-कराड बस उंब्रजजवळ उलटली; 7 जखमी.
-30 मे 2018 : नागपूर-तुळजापूर बस महामार्गावर उलटली; 2 ठार, 18 जखमी.
-30 मे 2018 : पुणे-नाशिक बसने टँकरला धडक दिली; 35 जखमी
-28 जून 2018 : मुरूड-पुणे शिवशाही बसची अलीबागजवळ एसटीशी समोरासमोर टक्कर; 15 जखमी.
-22 एप्रिल 2019 : पुणे-बंगळुरू महामार्गावरील मलकापूर येथे शिवशाही बस व ट्रकमध्ये टक्कर; 8 जखमी.
-9 जुलै 2019 : नांदेडजवळ चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; 4 जखमी.   

चालकांना मिळत नाही योग्य प्रशिक्षण

शिवशाही बसचे तंत्रज्ञान लाल परी, हिरकणी बसपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे या बसेस हाताळण्यापूर्वी संबंधित चालकाला योग्य प्रशिक्षण दिले जावे, असा आदेश आहे. परंतु, प्रशिक्षण दिले जात नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. अनेक चालकांना बस चालविण्याचा केवळ एक ते दोन वर्षांचा अनुभव असून अशा नवख्या व अप्रशिक्षित चालकांकडे शिवशाहीची धुरा सोपवली जात असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, वेळेअभावी योग्य प्रशिक्षण दिले जात नाही, अशी माहिती देण्यात आली.  

खासगी कंत्राटदारांच्या बसेसची होणार तपासणी

राज्यात शिवशाहीच्या सुमारे एक हजार बस सध्या विविध मार्गांवर धावत असून त्यापैकी पाचशे खासगी कंत्राटदारांच्या आहेत. तर पुणे विभागात 98 शिवशाहींपैकी तब्बल 63 बसेस खासगी कंत्राटदारांच्या मालकीच्या आहेत. खासगी कंत्राटदारांच्या बसेसची देखभाल-दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडूनच होणे अपेक्षित आहे. तसा करार महामंडळ व खासगी कंत्राटदारांमध्ये झालेला आहे. परंतु, वाढते अपघात विचारात घेता शिवशाहीच्या ताफ्यातील सर्वच खासगी कंत्राटदारांच्या बसेसची तपासणी करून अनफिट बसेस मार्गांवरून काढून टाकण्यात येतील, अशी माहिती एसटीच्या मुंबई स्थित वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘दै. पुढारी’शी बोलताना दिली.