Sun, Sep 20, 2020 04:21होमपेज › Ahamadnagar › साईमंदिराच्या देणगीत १८२ कोटींची घट

साईमंदिराच्या देणगीत १८२ कोटींची घट

Last Updated: Sep 10 2020 1:37AM
शिर्डी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. 17 मार्च ते 31 ऑगस्टपर्यंत साईभक्तांकडून विविध प्रकारे 20 कोटी 76 लाख 54 हजार 151 रुपयांची देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 203 कोटी 37 लाख 71 हजार 795 रुपयांची देणगी संस्थानला प्राप्त झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 182 कोटी 61 लाख 17 हजार 644 रुपयांच्या देणगीची घट झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

बगाटे म्हणाले की, देश व राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले आहे. संस्थानने 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मागील वर्षी 17 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत दक्षिणापेटीद्वारे साईभक्तांकडून 75 कोटी 29 लाख 78 हजार 927 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली होती. मात्र, यावर्षी मंदिर बंद असल्याने 17 मार्च ते 31 ऑगस्टदरम्यान दक्षिणापेटीद्वारे साईभक्तांकडून कोणतीही देणगी प्राप्त झाली नाही.

मागील वर्षी 17 मार्च ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत साईभक्तांकडून ऑनलाईन 1 कोटी 89 लाख 79 हजार 162 रुपये देणगी प्राप्त झाली होती. यामध्ये  दक्षिणा पेटीत 75 कोटी 29 लाख 78 हजार 927 रुपये, रोख देणगी 28 कोटी 6 लाख 47 हजार 805 रुपये, चेक व डी. डी. 11 कोटी 30 लाख 24 हजार 383 रुपये, मनिऑर्डर 98 लाख 61 हजार 48 रुपये, परकीय चलन 2 कोटी 52 लाख 61 हजार 710 रुपये, डेबिट व क्रेडिट कार्ड 11 कोटी 36 लाख 50 हजार 791 रुपये व इतर मार्गाने 71 कोटी 93 लाख 67 हजार 968 रुपये अशा विविध प्रकारे 203 कोटी 37 लाख 71 हजार 795 रुपये व सोने 8868.130 ग्रॅम आणि चांदी 1,94,481.480 ग्रॅम संस्थानला प्राप्त झाली होते.

यावर्षी 17 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 याकालावधीत साईभक्तांकडून ऑनलाईनद्वारे 11 कोटी 47 लाख 99 हजार 794 रुपये देणगी प्राप्त झाली आहेत. रोख देणगी 18 लाख 32 हजार 397  रुपये, चेक व डी. डी. 93 लाख 5 हजार 411 रुपये, मनिऑर्डर 66 लाख 21 हजार 56 रुपये, परकीय चलन 15 लाख 35 हजार 963 रुपये, डेबिट व क्रेडिट कार्ड 2 लाख 36 हजार 991 रुपये व इतर मार्गाने 7 कोटी 33 लाख 22 हजार 538 रुपये असे विविध प्रकारे 20 कोटी 76 लाख 54 हजार 151 रुपये संस्थानला प्राप्त झाले आहेत. संस्थानद्वारे दरमहा कर्मचारी वेतनावर सुमारे 12 कोटी रुपये खर्च होत असल्याचे बगाटे यांनी सांगितले.

 "