Fri, Aug 07, 2020 15:33होमपेज › Ahamadnagar › लोकसभेसाठी मतदारयाद्यांचे पुनःरिक्षण

लोकसभेसाठी मतदारयाद्यांचे पुनःरिक्षण

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 12:35AMनगर : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या पुनःरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. नवीन नोंदणी करणार्‍या मतदारांना जुन्या मतदार ओळखपत्राच्या ऐवजी नवीन स्मार्ट इपिक कार्ड देण्यात येणार आहे. मतदारांसाठी प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात हेल्पलाईन सुविधा उपलब्द्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, तहसीलदार सुधीर पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयाद्यांचा सखोल पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात नवीन मतदारनोंदणी वाढविण्यासह अचूक मतदार यादी तयार करण्याचा उद्देश आहे. या पुनःरिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो घेण्यात येणार आहेत. त्यासह कृष्णधवल फोटो असलेल्या मतदारांचे रंगीत फोटो घेण्यात येतील.

तसेच मतदार यादीतील चुका दुरुस्त करणे, मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, 18-19 वर्षे वयोगटातील मतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयात विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण 912 आहे. त्यामुळे महिला मतदारांची नावनोंदणी वाढविण्यासाठी गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटांना पुढाकार घेण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांचे दावे, हरकती स्वीकारण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नेमणूक करण्यात आली असून, तहसील कार्यालयात मतदार मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.

‘बीएलओ’ देणार घरोघरी भेटी

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे 15 मे ते 20 जून या दरम्यान मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन बीएलओ रजिस्टर अद्ययावत व सखोलपणे पूर्ण करण्याचे काम करतील. या भेटीत जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची मतदार नोंदणी, मयत, दुबार स्थलांतरित यांच्या चुका दुरुस्त करणे, नोंदवहीत याची नोंद घेणे असे कामकाज देण्यात आले आहे.

असा आहे पुनःरिक्षण कार्यक्रम

सखोल पुनःरिक्षण कार्यक्रमाची तयारी 11 मे पूर्वी, बीएलओ यांच्या घरोघरी भेटीची मोहीम 15 मे ते 20 जून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि मतदान केंद्र असलेल्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी 21 जून ते 31 जुलै, पुरवणीसह प्रारूप मतदार यादी तयार करणे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, एकात्मिक प्रारूप मतदारयादीची प्रसिद्धी 1 सप्टेंबर, दावे व हरकती करणे 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर, दावे व हरकती निकाली काढणे 30 नोव्हेंबर पूर्वी, मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी 4 जानेवारी 2019.