Thu, Jun 04, 2020 06:57होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : अवकाळी पावसाचा राहुरीत १० हजार शेतकर्‍यांना फटका

अहमदनगर : अवकाळी पावसाचा राहुरीत १० हजार शेतकर्‍यांना फटका

Last Updated: Mar 28 2020 4:39PM

अवकाळी पावसामुळे गहू पिकाचे झालेले नुकसान राहुरी (अहमदनगर) : पुढारी वृत्तसेवा

राहुरी तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १० हजार शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने ६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. उभे असलेले गहू व मका पीक पूर्णपणे झोपल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राहुरी परिसरामध्ये गुरूवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस अवकाळी पाऊस बरसला. शुक्रवारी सर्वत्रच धो धो पाऊस झाल्याने सर्वाधिक नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले आहे. वादळी वार्‍यासह पाऊस पडत असताना अनेक ठिकाणी घरांची पडझझ झाली तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. याबाबत तहसिलदार फसियोद्दीन शेख यांनी कृषी विभागासह मंडलाधिकारी व तलाठी यांची संयुक्तपणे बैठक घेत नुकसानीची माहिती घेण्यास आदेश दिले आहेत. तर कृषी विभागाचे अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी परिसरात गव्हाचे ३ हजार हेक्टर क्षेत्र काढणीला आलेले असतानाच अवकाळी बरसला. परिणामी गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासह हरबरा, कांदा, मका आणि फळ बागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शासनाला दिलेली आहे. अवकाळीमुळे सुमारे १० हजार शेतकरी बाधित असून ६ हजार हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी ठोकळे यांनी दिली आहे.

दरम्यान, राहुरी परिसरामध्ये शुक्रवारी राहुरी मंडळात २८.२ मिमी, देवळाली प्रवरा मंडळात ३२ मिमी, ताहाराबाद १५ मिमी, वांबोरी १ मिमी, टाकळीमिया २३ मिमी अशी नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. तर सात्रळ व ब्राम्हणी मंडळात पावसाची आकडेवारी निरंक आली आहे.

नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी पीक विमा भरला असल्यास तात्काळ कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राहुरी परिसरात अवकाळीचे सावट कायमच असून शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद पाळला जात असल्याने शेतीमाल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांची मागणी कमी झाली आहे. तसेच व्यापाऱ्यांनी शेतीमाल कमी भावात खरेदी करण्यास प्रारंभ केला होता. तोट्यात का होईना मिळेल ते चार पैसे पदरात पाडून घेतले जात असताना अवकाळीने शेतकर्‍यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.