Sat, Apr 10, 2021 20:45
अहमदनगर : पोलिसाच्या शेतात गांजा मिळाल्याने जोरदार चर्चा

Last Updated: Apr 04 2021 10:35AM

राहुरी : पुढारी वृत्तसेवा

राहुरी तालुक्यातील पिंपळगाव-फुणगी परिसरात शेतात गांजा आढळल्याप्रकणी राहुरी पोलिसांनी छापा टाकत दीड लाख रुपये किंमतीच्या गांज्यासह शेतकरी व शेतमजुरावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, संबंधित  शेतकऱ्याचा मुलगा व मुलगी पोलिस खात्यात असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांच्याच शेतात गांजा असल्याने याबाबत जोरदार चर्चा परिसरात होती.

अधिक वाचा : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पकडला तिप्पट वेग!

पिंपळगाव- फुणगी (ता.राहुरी) येथील शेतकरी बाळासाहेब दगडु थोरात यांच्या शेतात मोसंबीच्या बागेत व ऊसाच्या शेतात ठिकठिकाणी गांजाची झाडे असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाली. राहुरीच्या कायदा सुव्यवस्थेची नव्यानेच जबाबदारी घेतलेले पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलिस फौज फाट्यासह नायब तहसीलदार आण्णासाहेब डमाळे व महसूल पथकासह छापा टाकला. 

अधिक वाचा : अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण : न्यायालयाने तीन पोलिसांना बजावले वॉरंट

थोरात यांच्या शेतात ओली गांज्याची झाडे आढळली. पोलिसांनी १५ किलो  ४०० ग्रॅम वजनाचा अंदाजे १ लाख ५४ हजार ७० रूपये किमतीचा ओला गांजा हस्तगत केला. पोलिस उपनिरीक्षक निरज बेकील यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेतमजूर बाजीराव रभाजी खेमनर (वय ७०) व शेतकरी बाळासाहेब दगडु थोरात राहणार पिंपळगाव फुणगी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा : कल्याणराव काळेंची राष्ट्रवादीशी डीनर डिप्लोमसी

संशयित आरोपी शेतमजुर बाजीराव खेमनर यास अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, निरज बेकील यांच्या पथकाने ही कारवाई केली.