Wed, Aug 12, 2020 09:35होमपेज › Ahamadnagar › खरिपासाठी वेळेवर पीककर्ज उपलब्ध करा

खरिपासाठी वेळेवर पीककर्ज उपलब्ध करा

Last Updated: Jun 06 2020 12:14AM

नगर ः जागतिक पर्यावरणदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. समवेत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह आनगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरोनाचा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज मिळणे गरजेचे आहे. सध्या केवळ 18 टक्के इतकेच पीककर्ज वाटप  झाले आहे.  कर्ज वाटपाचा वेग वाढवा. विशेषता राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना  वेळेवर कर्ज मिळेल, यासाठी गतीने कार्यवाहीच्या सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात शुक्रवारी थोरात यांनी खरीप पीक कर्ज वाटप तसेच निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर, कृषी उपसंचालक विलास नलगे यांची उपस्थिती होती.
थोरात म्हणाले, सध्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तसेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज मिळाले तरच त्यांना त्याचा लाभ होतो. राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांनी ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे आणि अधिकाधिक कर्जवाटप होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 बी- बियाणे, खते, कीटकनाशके यांची टंचाई जाणवू नये, यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. केवळ घरगुती नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे विक्रीसाठी येत आहेत, त्यांची उगवणक्षमता तपासावी. जेणेकरुन शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या.

युरिया खताचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत राहील, त्याचा साठेबाजार होणार नाही, याची काळजी कृषी विभागाने घेतली पाहिजे. त्याचबरोबर, कोरोनाचे संकट असताना दुकानासमोर शेतकर्‍यांच्या  रांगा लागणार नाहीत, याचीही काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी केली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यात अनेक कच्च्या व पक्क्या घरांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवाल जरी जिल्हा प्रशासनाने तयार केला असला तरी सविस्तर पंचनामे करण्याचे निर्देश दिले.