Wed, Aug 12, 2020 08:37होमपेज › Ahamadnagar › पुण्यातला पोलिस चोरांचा सरदार !

पुण्यातला पोलिस चोरांचा सरदार !

Published On: May 23 2019 1:36AM | Last Updated: May 23 2019 1:55AM
पारनेर : प्रतिनिधी      

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पोलिसच निघोजमध्ये झालेल्या चोरीचा म्होरक्या असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड याला तडकाफडकी निलंबित केले. निघोज येथे रविवारी रात्री 10 ते सोमवारी दुपारी एकच्या सुमारास प्रदीप ताराचंद गांधी यांच्या गोदामाच्या शटरचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण 5 लाख 96 हजार 50 रुपयांचा तंबाखू-सिगरेट असा माल चोरून नेला होता. रविवारी रात्री 10 वाजता प्रदीप गांधी व त्यांचा मुलगा त्यांचे दुकान अमित सुपर मार्केट, तसेच देवीच्या मंदिराजवळील गोदाम बंद करून घरी गेले होते. 

दुसर्‍या दिवशी गांधी हे खासगी कामानिमित्त नगर येथे गेले असता, दुपारी एकच्या सुमारास त्यांचा नोकर मिलिंद ढवळे याने कळविल्याप्रमाणे त्यांच्या गोदामात चोरी झाल्याची माहिती गांधी यांना समजली. नंतर त्यांनी पारनेर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. पारनेर पोलिस ठाण्यात गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास जेरबंद करण्यासाठी पारनेर पोलिस पुण्याकडे रवाना झाले आहेत.

वाईन, बिअर शॉपीफोडीत हात? 

नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात फोडलेले वाईन शॉप,  तसेच बियर शॉपींच्या गुन्ह्यांत याच टोळीचा हात असल्याचे प्राथमिक धागेदोरे पोलिस तपासात हाती आले आहेत.  पोलिस पथक त्यादृष्टिनेही तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असल्यामुळे आरोपी पोपट गायकवाड यास पुणे ग्रामीणच्या हद्दीमधील अनेक अवैध व्यवसायांची  माहिती आहे. या व्यावसायिकांनाही त्याने आजवर ठकविले असून अनेकांच्या अवैध व्यवसायात त्याची भागिदारी असल्याची माहितीही पुढे आली . 

चौकीदारामुळे तपास सुकर

आपण सीबीआय अधिकारी आहोत, आपणासोबत पोलिस असून, ते गोदामातील माल जप्त करण्यात आल्याची बतावणी करून गायकवाड याचे साथीदार चोरी करीत होते. अशीच बतावणी त्याने मंदिराच्या सुरक्षारक्षाकाला केली. सुरक्षा रक्षकाने शिताफीने गायकवाडचे संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले. गांधी यांच्या दुकानात चोरी झाल्याचे समजल्यानंतर सुरक्षा रक्षकाने संबंधित रेकॉर्डिंग पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यामुळे पोलिस तपास अधिक सुकर झाला.

लांबवलेला माल : 1 लाख 74 हजार रुपयांची गायछाप तंबाखू, 80 हजार रुपयांची ब्रिस्टॉल सिगारेट, 1 लाख 35 हजार रुपयांची  गोल्ड फ्लेक सिगारेट, 17 हजार 200 रुपयांचे पारले चॉकलेट, 4 हजार 500 रुपयांची पांढरी सुपारी, 9 हजार 600 रुपयांचे विडी कार्टून, 42 हजार रुपयांची किंग सिगारेट, 33 हजार 750 रुपयांची लाईट सिगारेटअसे बिंग फुटले

प गेल्या वर्षी पोलिस चौकीजवळच मळगंगा मंदिरात झालेल्या चोरीपाठोपाठ मंदिराजवळीलच गोदाम फोडल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. 
प दोघा साथीदारांसह पोपट गायकवाड एका वाहनातून मळगंगा मंदिर परिसरात आला आणि त्याच्या साथीदारांनी गोदाम फोडले आणि पोपट पसार झाल्याचे चित्रण पोलिसांच्या हाती लागले. 
प मंगळवारी रात्री पुणे ग्रामीण पोलिसांना त्यासंदर्भात अहवाल दिला. अहवालाच्या आधारे पुणे ग्रामीणचेे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गायकवाड यास निलंबित केले.