होमपेज › Ahamadnagar › अकरा जणांना जेवणातून विषबाधा

अकरा जणांना जेवणातून विषबाधा

Last Updated: Nov 16 2019 2:02AM
नगर : तालुका प्रतिनिधी 
नगर तालुक्यातील देहरे येथील भिल्ल वस्तीतील एकाच कुटुंबातील 11 जणांना जेवणातून विषबाधा झाली. त्यामुळे या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक लहान मूल व तरुणाची प्रकृती गंभीर आहे. मात्र, इतरांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. या कुटुंबातील नवरदेव-नवरी देवदर्शनाला गेल्यामुळे ते या घटनेतून वाचले

देहरे येथील माळी, वाघ, पवार या कुटुंबांतील नातेवाईकांचे पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे गुरूवारी (दि.14) लग्न होते. हे लग्न आटोपून या कुटुंबांतील लोक शुक्रवारी (दि.15) देहरे येथे परतले. त्यानंतर त्यांनी आपल्या घरी स्वयंपाक केला. या जेवणातूनच त्यांना विषबाधा झाल्याचे समजते. जेवणासाठी बाजरीचे पीठ वापरले गेले होते. सततच्या पावसाने ही बाजरी ओली झाल्याने त्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे 

जेवणातून विषबाधा झालेल्यांमध्ये कार्तिक सूरज पवार, मोनाली रमेश माळी, राहुल रमेश माळी, सुनिता राहुल माळी, सुदर्शन अतुल वाघ, ललिता अतुल वाघ, पूजा भास्कर वाघ, सूरज रोहिदास पवार, जनाबाई शंकर माळी, धीरज रमेश पवार यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

विषबाधा बाजरीमुळे
देहरे गावामध्ये विषबाधा झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक उपायुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गावात भेट दिली. विषबाधा झालेल्या व्यक्तींनी बाजरी खाल्ल्याचे निष्पन्न झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाजरी बाधित झालेली आहे. त्यामधून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाजरीचे पीठ प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहे.