Mon, Sep 21, 2020 11:39होमपेज › Ahamadnagar › ‘एस्को’ प्रकल्पांतर्गत पथदिव्यांची देखभाल!

‘एस्को’ प्रकल्पांतर्गत पथदिव्यांची देखभाल!

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 10:19PMनगर : प्रतिनिधी

शहरातील पथदिवे व्यवस्था बळकटीकरणासाठी व पथदिव्यांचे विज बील, देखभाल दुरुस्तीवर होणार्‍या खर्चात बचत करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नवीन व्यवस्था उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ‘एस्को’ प्रोजेक्ट अंतर्गत 10 वर्षांसाठी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. येत्या सभेत धोरण निश्‍चित होणार आहे. या प्रकल्पामुळे आगामी 10 वर्षात मनपाची सुमारे 40 कोटींपर्यंत बचत होऊ शकते, असा विश्‍वास महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्‍त केला.

जुनी विद्युत व्यवस्था बदलून नवीन एलईडी व्यवस्था उभी करण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरु केले आहेत. संपूर्ण शहरात सर्वेक्षण करण्यात आले आहे. लाईटनिंग एन्व्हायरमेंट डिझाईन या कंपनीने विद्युत व्यवस्थेचे परीक्षण करुन त्रुटी व नवीन उपाययोजनांबाबत अहवाल दिला आहे. शहरात 36 हजार 500 पथदिवे आहेत. यात विद्युत मीटर कार्यरत नसणे, सुरु असलेले मीटर सदोष असणे, पॅनल बॉक्स सुस्थितीत नसणे, फीडर नादुरुस्त, पथदिव्यांची वायरिंग सुस्थितीत नसणे यासह सोडीअम व्हेपर, हायपॉवर बल्ब आदी विविध कारणांमुळे महापालिकेला पथदिव्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे सदोष मीटर बदलणे, मीटरची संख्या वाढविणे, फीडर, पॅनल बॉक्स, स्वीच अद्ययावत करणे, आवश्यक ठिकाणी नवीन बसविणे, वीजवाहक तारा, वायरिंग आदी बदलणे, दुरुस्ती करणे, योग्य क्षमतेचे एलईडी दिवे वापरुन सदर व्यवस्था स्वयंचलित करणेची शिफारसही संस्थेकडून करण्यात आली आहे.

या संदर्भात प्रशासनाकडून प्रस्ताव आला आहे. पथदिव्यांच्या वीजबिलावर दरवर्षी 6.60 कोटी, देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी 70 लाख, मनपा कर्मचार्‍यांवर 1.44 कोटी असा दरवर्षी सुमारे 8.74 कोटी खर्च महापालिका करत आहे. यात बचत करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार एस्को प्रकल्पा अंतर्गत 10 वर्षांसाठी संस्थेची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे शहरातील पथदिवे व्यवस्था सुस्थितीत आणून त्याची देखभाल व दुरुस्ती सर्व सदरची संस्था करणार आहे. त्याचा सर्व खर्च संबंधित संस्था करणार असल्याने मनपावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. याउलट मनपाकडून होत असलेल्या खर्चात 60 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. दरवर्षी साधारणपणे 3.96 कोटींची बचत व त्याच्या 10 टक्के रक्कम संस्थेकडून मनपाला रॉयल्टी म्हणून मिळणार आहे. उर्वरीत रकमेतून सदरची संस्था त्यांचा सर्व खर्च भागविणार आहे. त्यामुळे आगामी 10 वर्षात सुमारे 40 कोटींची बचत होऊ शकेल. महापालिकेच्या आर्थिक हिताला प्राधान्य देऊन शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची विद्युत व्यवस्था पुरविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. सर्वसाधारण सभेत धोरण निश्‍चित होऊन संस्थेच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात येणार असल्याचे महापौर कदम यांनी सांगितले.