Wed, Aug 12, 2020 13:05होमपेज › Ahamadnagar › कार्यकर्त्यांनो,निवडणुकीच्या कामाला लागा

कार्यकर्त्यांनो,निवडणुकीच्या कामाला लागा

Published On: Jan 13 2018 1:10AM | Last Updated: Jan 12 2018 10:22PM

बुकमार्क करा
श्रीगोंदा : प्रतिनिधी

राज्यासह देशभरात भाजप विरोधात लोकमत तयार होत आहे. ही संधी लक्षात घेऊन ही विरोधी लाट आपल्याकडे खेचण्यासाठी व आगामी  राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता गृहीत धरून कार्यकर्त्यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सांगत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी जागे व्हा आणि कामाला लागा, असा आदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. शुक्रवारी तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

दिलीप वळसे पाटील म्हणाले, युती सरकार जाणीवपूर्वक शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सातत्याने आवाज उठवीत आहेत.  आगामी निवडणुका डोळ्यासमोर कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. गावागावात जाऊन पक्षाच्या कामाची माहिती दिली पाहिजे. लोकसभेचा उमेदवार अद्याप निश्‍चित नसला तरी विधानसभेला मात्र पुन्हा ‘दादा एके दादा’ असे म्हणत वळसे पाटील यांनी आ. राहुल जगताप यांची विधानसभा उमेदवारी निश्‍चित असल्याचे संकेत दिले. 

जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष नेहमी शेतकर्‍यांच्या पाठिशी राहिला आहे. मात्र शेतकरी व सहकार मोडीत काढण्याचे सध्याच्या सरकारचे षडयंत्र आहे. समाजातील प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी शेतककार्‍यांसह कामगार वर्गाला देखील रस्त्यावर उतरावे लागेल. सन 2019 मध्ये आ. राहुल जगताप यांना विधानसभेची दुसर्‍यांदा संधी देणे हीच कै. कुंडलिकराव जगताप यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे घुले म्हणाले. 

आ. जगताप म्हणाले, सध्याचे सरकार सत्ता टिकविण्यासाठी शेतकरी उद्ध्वस्त करायला निघाले आहे. सहकाराबाबत सरकार दुतोंडी भूमिका घेत आहे. आपण विरोधी पक्षात असूनही मतदार संघातील वीज, रस्ते आणि पाणी या प्रमुख समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले. आगामी दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य देऊ, असेही आ. जगताप म्हणाले. 

यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, प्रा. तुकाराम दरेकर आदींची भाषणे झाली. माजी आ. दादाभाऊ कळमकर, अविनाश आदिक, सोमनाथ धूत, सचिन जगताप, दत्तात्रय पानसरे, कल्याणी लोखंडे, मीना आढाव आदी उपस्थित होते. रतालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी आभार मानले.