होमपेज › Ahamadnagar › कांदा उत्पादकांचा उपबाजार समितीसमोर साडेतीन तास ‘रास्ता रोको’

कांदा उत्पादकांचा उपबाजार समितीसमोर साडेतीन तास ‘रास्ता रोको’

Published On: Mar 10 2018 11:52PM | Last Updated: Mar 10 2018 11:51PMनगर : प्रतिनिधी

येथील नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याचे भाव अचानक गडगडल्याने शेतकर्‍यांच्या संतापाचा पारा चढला. बाजार समितीसमोर साडेतीन तास रास्तारोको करत सोमवारी लिलाव घेण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. नायब तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कांद्याचे भाव कमी झाल्याने बाजार समितीने सकाळीच ध्वनिक्षेपकावर सूचना देऊन  व्यापारी व आडत्यांनी कांद्याचे लिलाव न करण्याच्या सुचना दिल्या. बाजार समितीने आवाहन करूनही व्यापारी, आडत्यांनी कमी भावाने कांद्याचे लिलाव सुरूच ठेवले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते.

शेतकर्‍यांनी याची माहिती नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर व संदेश कार्ले यांना दिली. त्यानंतर भोर व कार्ले यांनी बाजार समितीत धाव घेत शेतकर्‍यांसह लिलाव बंद पाडले. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत रस्त्यावर रास्तारोको सुरु केला. भोर यांनी याची कल्पना तहसीलदारांना दिली. नायब तसीलदार अर्चना भाकड यांनी बाजार समितीत येत निवेदन स्वीकारले. सोमवारी (दि. 12) लिलाव घेण्याची मागणी करण्यात आली. राज्यात बाकीच्या बाजार समित्यांमध्ये जो भाव दिलेला असेल तोच देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तब्बल तीन तासांनी रास्तारोको मागे घेण्यात आला.

पदाधिकारी-व्यापार्‍यांची साखळी

बाजार समितीत पदाधिकारी, व्यापारी व आडते यांची मोठी साखळी आहे. त्यामुळेच बाजार समितीने सूचना देऊनही लिलाव सुरूच होते. 4 ते 8 रुपयांपर्यंत कांद्याचे दर कोसळले होते. शेतकर्‍यांनी मागणी करूनही लिलाव सुरूच असल्याने आंदोलन करण्यात आले. याची दखल न घेतल्यास शेतकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. - रामदास भोर, सभापती, पंचायत समिती

कांद्यालाही अनुदान द्यावे

कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने पाऊले उचलणे आवश्यक आहे. तूर उत्पादक शेतकर्‍यांप्रमाणे कांदा उत्पादकांच्या कांद्याची खरेदी शासनाने करून शेतकर्‍यांना अनुदान दिले पाहिजे. अथवा कांद्यावर प्रक्रिया उद्योग स्थापन केले पाहिजेत.    - संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना