होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ विधानावरून इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी

‘त्या’ विधानावरून इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी

Last Updated: Feb 18 2020 6:24PM

समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकरअहमदनगर : : पुढारी वृत्तसेवा

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे वक्‍तव्य करुन अडचणीत आलेले समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. समाजमाध्यमांत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे इंदोरीकर महाराजांनी म्हटले आहे.

वाचा : इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा

गेल्या आठ दिवसांपासून निवृत्ती महाराज इंदोरीकर चर्चेत आले आहेत. सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे वक्‍तव्य त्यांनी केले होते. या वक्‍तव्याने ते अडचणीत आले आहेत. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी इंदोरीकर महाराज यांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही यामध्ये उडी घेत इंदोरीकरांच्या अडचणीत भर टाकली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराजांनी पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे.

वाचा : इंदुरीकर महाराजांचे विधान अशास्त्रीय : हमीद दाभोलकर

माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. समाज माध्यमांमध्ये माझ्या वक्तव्याचा विपर्यास होतोय, माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही अपेक्षा, अशा शब्दांत हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे.

''मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून, गेल्या २६ वर्षांच्या कार्यकाळात किर्तनरूपी सेवेतून समाजप्रबोधन, समाज संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन, विविध जाचक रूढी, परंपरा यावर भर दिला आहे. माझ्या किर्तनरूपी सेवेतील वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा!'' असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

वाचा : इंदुरीकर महाराजांची तपश्चर्या वाया घालवू नका : चंद्रकांत पाटील 

गेल्या आठ दिवसांपासून माझ्या किर्तनरूपी सेवेतील वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह समाजमाध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.