Wed, Aug 12, 2020 20:12होमपेज › Ahamadnagar › नगर : नितीन आगेचा खूनच; १३ साक्षीदार फितूर

नगर : नितीन आगेचा खूनच; १३ साक्षीदार फितूर

Published On: Dec 05 2017 5:51AM | Last Updated: Dec 05 2017 5:51AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी
खर्डा येथील दलित युवक नितीन आगे याचा खून गळा आवळून  झाल्याचे निरीक्षण न्यालयाने नोंदविलेले आहे. परंतु, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरुद्ध न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही, म्हणून त्यांची सुटका करण्यात आली. यास 13 फितूर साक्षीदार कारणीभूत आहेत, असे खटल्याचे काम पाहणारे सरकारी वकील अ‍ॅड. रामदास गवळी यांनी काल (दि. 4) पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा हेही उपस्थित होते. 

अ‍ॅड. गवळी म्हणाले, 'याप्रकरणातील अपिलाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस कर्मचार्‍यामार्फत सरकारी पक्षाने विधी व न्याय खात्याच्या सहसचिवांकडे पाठविला आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात अपील करण्यात येईल.'

न्यायालयाचे निरीक्षण

सरकारी वकिलांची माहिती; फितूर साक्षीदारांवर कारवाई दंड विधान 193 अन्वये कायदेशीर कारवाईबाबतची प्रक्रिया सरकारी पक्षाकडून जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू करण्यात येणार आहे. 13 पैकी 8 साक्षीदारांचे न्यायदंडाधिकार्‍यांसमोर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 164 अन्वये जबाब नोंदविले आहेत. तरीही हे साक्षीदार फितूर झालेले आहेत. या खटल्यात एकूण 26 साक्षीदार होते. पोलिस, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, काही पंचांची पोलिस तपासात दिलेलीच साक्ष न्यायालयातही कायम ठेवली. परंतु, काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, शिक्षकांनी साक्ष फिरविली. पोलिसांनी यातील एका साक्षीदाराची साक्ष दोन महिने उशिरा घेतली होती. तोही न्यायालयात फितूर झालेला
आहे. वैद्यकीय अहवालानुसार आरोपी मृत्यू हा आत्महत्येने नव्हे, तर गळा आवळल्याने झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविलेले आहे. हा खून होता. मात्र, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनीच तो केल्याचे  सिद्ध होऊ शकले नाही. साक्षीदार फितूर होऊ लागल्याने मूळ फिर्यादीतर्फे काम पाहणार्‍या खासगी वकिलांनीही खटल्यातून अंग काढून घेतले. तसेच
पोलिसांनी साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष कशी द्यायची, याचे मार्गदर्शन केले होते. मात्र, साक्षीदार न्यायालयात फितूर झाले. फितूर साक्षीदारांविरुद्ध फौजदारी कारवाईची प्रक्रिया करून अपील करून मयताला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही अ‍ॅड. गवळी म्हणाले. 

...हे झाले खटल्यात फितूर
न्यायदंडाधिकार्‍यांसमोर जबाब फितूर झालेल्यांमध्ये अशोक विठ्ठल नन्नवरे (मयताचे वकील काम करीत असलेले खाणमालक), रावसाहेब अण्णासाहेब सुरवसे (डंपरचालक), लखन अशोक नन्नवरे (खाणमालकाचा मुलगा), सदाशिव मुरलीधर डाडर (घटनास्थळ पंच), विष्णू गोरख जोरे (न्यू इंग्लिश स्कूल, शिक्षक व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार),
राजेंद्र बाजीराव गिते (शिक्षक, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार), बाळू ज्ञानदेव जोरे (शिक्षक), रमेश भगवान काळे (मारहाण करताना पाहिलेला साक्षीदार) यांचा समावेश आहे. तसेच पोलिसांसमोर जबाब दिलेले सदाशिव अश्रूबा होडशीळ, विकास कचरू डाडर, हनुमंत परमेश्‍वर मिसाळ, राजू सुदाम जाधव व साधना मारुतीराव फडतरे हेही फितूर झाले होते.