Wed, Aug 12, 2020 08:30होमपेज › Ahamadnagar › नीलेश लंके यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी

नीलेश लंके यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:02AMपारनेर ः प्रतिनिधी      

पक्षशिस्त मोडल्याच्या कारणावरून नीलेश लंके यांना शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदावरून पदच्युत करण्यात आले होते. आता पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत लंके यांची शिवसेनेतूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव खा. विनायक राऊत यांनी मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही घोषणा केली. 

जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीपासून आ. विजय औटी व लंके यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. आ. औटी यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात लंके यांच्याकडून पक्षाच्या शिस्तीविरूद्ध वर्तन घडले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर लंके हे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून, घोषणाबाजी करीत कार्यक्रमस्थळी आले. लंके यांची ही कृती ठाकरे यांना रूचली नाही. त्यांनी तेथेच संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना निर्देेश देत लंके यांचे शक्तिप्रदर्शन थांबविण्यास भाग पाडले. हे थोडे झाले म्हणून की काय ठाकरे हे हेलिपॅडकडे जात असताना ठाकरे यांचे अंगरक्षक बसलेल्या आ. विजय औटी यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. ही बाब ठाकरे यांच्या कानावर गेल्यानंतर लंके यांच्यावर तत्काळ कारवाईचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर काही दिवसांत लंके यांना तालुकाप्रमुख पदावरून पायउतार करण्यात आले होते. 

तालुकाप्रमुखपदावरून हटविण्यात आल्याची बाब लंके समर्थकांच्या चांगलीच जिव्हारी लागली. लंके यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सेनेशी निष्ठा दाखवित परंतु आ. औटी यांना विरोध दर्शवित या कार्यक्रमात बंडाचे संकेतही देण्यात आले. पुढे शिवसेना सोडून गावोगावी नीलेश लंके प्रतिष्ठाच्या शाखांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू करण्यात येऊन समांतर संघटना बांधणीसही प्रारंभ झाला. ही बाबही पक्षप्रमुखांपर्यंत गेल्यानंतर लंके यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार पक्षाचे सचिव खा. राऊत लंके यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात येत असल्याचे जाहीर केले. 

लंके यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर समर्थकांनी लंके यांच्या त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्या. या पोस्ट दिवसभर सोशल मीडियावर फिरत होत्या.