Sun, Aug 09, 2020 11:28होमपेज › Ahamadnagar › नगर : १२ वीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

नगर : १२ वीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

Last Updated: Jun 21 2020 7:31AM
जामखेड (नगर) : पुढारी वृत्तसेवा  

डोणगाव ( ता. जामखेड) येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा मुतदेह एका विहीरीत तरंगताना आढळून आला. ही मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात मुलीच्या आजोबांनी बेपत्‍ता असल्‍याची तक्रार दाखल केली होती. घटनास्थळी जामखेडचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते.

पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, डोणगाव येथील इयत्ता बारावीची विद्यार्थीनी मुक्ता संभाजी वारे (वय १७, रा. डोणगाव, मुळगाव रत्नापुर, ता. जामखेड) ही गुरुवारी (दि. १८) सायंकाळपासून बेपत्ता होती. त्यामुळे नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला, पण तीचा शोध न लागल्‍याने मुलीचे आजोबा शहाजी कोंडीबा यादव यांनी दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि. १९) जामखेड पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

शनिवारी (दि. २०) मुक्ता वारे हिचा कुटुंबाकडून शोध सुरू होता. या दरम्‍यान नातेवाईकांना तिचा मृतदेह सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास डोणगाव येथील तिच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील विहीरीत तरंगताना आढळला. यानंतर डोणगावचे पोलिस पाटील बिभीषण यादव यांनी या घटनेबाबत जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना कळवले. त्यानंतर पलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक संजय बोकील, पोलिस कॉन्स्टेबल  शिवाजी भोस, बाजीराव सानप, गणेश साने, अजय साठे, विष्णू चव्हाण, शेषराव म्हस्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. 

यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मुक्ता वारे हिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले असून, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी मुलीचे वडील संभाजी रामभाऊ वारे (रा. रत्नापूर) यांनी जामखेड दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलिस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.