Mon, Aug 03, 2020 14:36होमपेज › Ahamadnagar › उच्च दर्जाचे कौशल्य व ताकदीचा अविष्कार

उच्च दर्जाचे कौशल्य व ताकदीचा अविष्कार

Last Updated: Jan 14 2020 1:40AM
नगर ः प्रतिनिधी 
रणगाड्यांच्या आग ओकणार्‍या तोफा, त्यांतून निघणारे आगीचे डोंब, हलक्या लढाऊ वाहनांच्या धडाडणार्‍या मशीन गन्स अन् त्यांची साथ घेऊन पायदळाने शत्रूची दाणादाण उडवून  घेतलेला त्याच्या केंद्राचा कब्जा...सर्वत्र उडालेले धूळ व धुराचे लोट... हा घटनाक्रम पाहताना येथील खारेकर्जुने येथील युद्धसराव मैदानावर (के. के. रेंजेस) उपस्थितांनी भारतीय सैनिकांचे उच्च दर्जाचे युद्ध कौशल्य व देशाकडील घातक शस्त्रांची ताकद सोमवारी अनुभवली. तेथील प्रात्यक्षिके पाहताना सर्वांनी प्रत्यक्ष युद्धाचा थरार अनुभवला. 

सध्याच्या भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या उच्च ब व अचूक मार्‍याची क्षमता असणार्‍या सैनिकांच्या हातात देश सुरक्षित असल्याचा विश्‍वास उपस्थितांना मिळाला. भारतीय सैन्याच्या यांत्रिक सशस्त्र दलांची ताकद व तांत्रिक सुसज्जता या निमित्ताने उपस्थितांना दाखवण्यात आली. मारक क्षमता, वेगवान हालचाली व शत्रूला  धक्का देणारी कृती, यांच्या जोरावर लष्कर शत्रूला कसे नामोहरम करू शकते, याचे प्रत्यंतर सर्वांना आले. नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल (एसीसीएस) व मॅकेनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सर्वांत प्रथम प्रात्यक्षिकांत सहभागी होणारे रणगाडे व बीएमपींच्या मारक क्षमतेसह वैशिष्ट्ये व इतर सर्व तांत्रिक माहिती देण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात प्रत्यक्ष युद्ध कसे लढले जाते, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यासाठी ‘हंटर - किलर’ (शिकार व नाश) तत्त्वाचा वापर करण्यात आला. जम्मू-काश्मीर, तसेच पंजाब व राजस्थानच्या सीमांवर देशरक्षणासाठी यांत्रिक सशस्त्र दले सज्ज असल्याची जाणीव करून देण्यात आली. 

दरवर्षी जानेवारी महिन्यात भारतीय सैन्याच्या मारक क्षमतेची जाणीव करून देणारी ही प्रात्यक्षिके होत असतात. त्यासाठी देशभरातून प्रशिक्षण घेणारे लष्करी अधिकारी टप्प्याटप्प्याने येथे येत असतात. 23 डिसेंबरपासून ‘केके रेंजेस’वर दररोज ही प्रात्यक्षिके झाली. सोमवारी त्यांचा समारोप होता. अर्जुन, टी 90 एस (भीष्म), टी 72 (अजेय) हे रणगाडे, हलकी लढाऊ वाहने (बीएमपी दोन) व सीएमटी (करिअर मोटर ट्रॅक्ड), चार किलोमीटरवरील लक्ष्याचा वेध घेणारी रणगाडाभेदी ‘काँकर्स’ ही क्षेपणास्त्रे, एक सुखोई एम. के. 30 विमान, तीन लढाऊ हेलिकॉप्टर्सचा या प्रात्यक्षिकांत सहभाग होता. 
या सर्वांसाठी समोर पाचशे मीटर पासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत विविध लक्ष्ये ठेवण्यात आली होती. रणगाड्यांच्या मुख्य गन व विमानभेदी गन्सच्या साह्याने जवानांनी या लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. या शिवाय काँकर्स हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र ‘बीएमपी 2’ वरून व जमिनीवरील लाँचरवरून डागून तीन किलोमीटरवरील लक्ष्ये भेदण्यात आली. लक्ष्य अचूक भेदल्यावर टाळ्यांचा कडकडाट व लक्ष्यभेद करणार्‍यांची माहिती ध्वनिक्षेपकावरून सांगितली जात होती. लक्ष्यभेद करणार्‍या जवानांचे नाव घेऊन त्यांना शाबासकी देण्यात आली. 

रणगाड्यांतून तोफगोळे डागल्यावर दूरवर दिसणारे धुराचे लोट व त्यानंतर येणार्‍या स्फोटांच्या आवाजांनी केके रेंज दणाणत होते.आज ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल एस. झा (विशिष्ट सेवा पदक), एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर  विजयसिंह राणा (विशिष्ट सेवा  पदक), जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपवन संरक्षक आदर्श रेड्डी आदींसह डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे विद्यार्थी, तसेच टेक्निकल स्टाफ ऑफिसर्स कोर्सचे विद्यार्थी व मित्र देशांतील लष्करी अधिकारी उपस्थित होते.