Sat, Oct 24, 2020 08:57होमपेज › Ahamadnagar › पवारांच्या राजकारणामुळे देशाच्या राजकीय व्यवस्थेला घातक वळण; विखेंचा गंभीर आरोप

पवारांच्या राजकारणामुळे देशाच्या राजकीय व्यवस्थेला घातक वळण; विखेंचा गंभीर आरोप

Last Updated: Oct 23 2020 1:18AM

संग्रहित फाेटाे अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ‘स्वयंघोषित मानसपुत्र’ होते. सत्तेसाठी काहीही करण्याची पवार यांची तयारी होती, अशा अनेक टीकास्त्रांनी पद्मभूषण (स्व.) डॉ.  बाळासाहेब  विखे यांचे आत्मचरित्र भरलेले आहे. या पुस्तकात काय आहे, याची माहिती बाहेर येताच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

‘देह  वेचावा  कारणी’या  नावाने  असलेल्या  या आत्मचरित्राचे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  हस्ते  व्हर्च्युअल  पद्धतीने  प्रकाशन  झाले. डॉ. विखे पाटील यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव  चव्हाण  व  पवार  यांच्या  संबंधांवर  आपल्या  नजरेतून  त्यात  प्रकाश  टाकला  आहे.  

1980  नंतर  यशवंतराव  चव्हाण  यांचे  राजकीय  वजन  घटले,  अशी  चर्चा  पसरविण्यामध्ये  पवार  यांचाच वाटा होता, असा आरोपही या पुस्तकात करण्यात  आला  आहे.  या  पुस्तकात  डॉ.  विखे-पाटील  यांनी  पवार  यांचे  गुण-अवगुण  यांचा  उल्लेख  केला  आहे.  पवार  यांना  राजकीय,  सामाजिक  प्रश्‍नांची  चांगली  जाण  आहे;  पण  त्यांच्यातील राजकारण्याने त्यांच्या  या चांगल्या गुणांवर मात केली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या  आत्मचरित्रात  देशातील  पहिल्या  सहकारी  साखर  कारखान्याच्या  उभारणीत  अण्णासाहेब  शिंदे यांचादेखील वाटा असल्याचे म्हटले आहे. त्याचा  जोरदार  प्रतिवाद  विखे  यांनी  केला  आहे. 

 या कारखान्याची स्थापना आपले वडील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील, धनंजयराव गाडगीळ व त्यांच्या सहकार्‍यांनी 1950 मध्ये केली होती. अण्णासाहेब  शिंदे 1955  साली  कारखान्याचे  संचालक झाले. असे त्यांनी म्हटले आहे.

राजकीय व्यवस्थेला घातक वळण 

पवार यांनी 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) या नावाने आघाडी सरकार स्थापन केल्याने त्यांची राजकीय घसरण झाली, असे निरीक्षण डॉ. विखे यांनी नोंदवले आहे. पवार यांच्या राजकारणामुळे देशाच्या राजकीय व्यवस्थेला घातक वळण लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी पुस्तकात केला आहे.

 "