Wed, Aug 12, 2020 03:45होमपेज › Ahamadnagar › जिल्हा परिषदेतही होणार महाशिवआघाडी ?

जिल्हा परिषदेतही होणार महाशिवआघाडी ?

Last Updated: Nov 16 2019 1:59AM
नगर : केदार भोपे
राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येत ‘महाशिवआघाडी’ची मुहूर्तमेढ रोवली असतांना, दुसरीकडे जिल्हा परिषदेतही याच प्रयोगाची चाचपणी करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 19) अध्यक्षपदासाठी सोडत निघणार असून, त्यानंतर खर्‍या अर्थाने यासंदर्भातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

सद्यस्थितीत काँग्रेसच्या शालिनी विखे या अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतर अध्यक्ष कोण होणार हे आरक्षणाच्या सोडतीवर अवलंबून आहे. राज्यात ‘महाशिवआघाडी’चा प्रयोग यशस्वी होत असल्याने ‘मिनी मंत्रालयातील’ धुरिणांनी या प्रयोगाची जिल्ह्यात ‘चाचपणी’ सुरु केली आहे. अध्यक्षा शालिनी विखेंचे सुपुत्र खासदार सुजय व पतीराज आमदार राधाकृष्ण यांनी भाजपात प्रवेश केलेला असला तरी, शालिनीताईंनी मात्र आपण अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचे सांगितले आहे.

असे असले तरी जिल्हा परिषदेच्या राजकारणातून भाजप व विखेंना दूर सारण्यासाठी काँग्रेसच्या थोरात व राष्ट्रवादीच्या पवार गटाने स्थानिक पातळीवर ‘खलबतं’ सुरु केली आहेत. शालिनीताई जरी तांत्रिकदृष्ठ्या काँग्रेसमध्ये असल्या तरी भाजपच्या कार्यक्रमांमधील त्यांची उपस्थिती लपून राहिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातला थोरात गट व राष्ट्रवादी आधीच सावध झाले आहेत. आरक्षणाची पद्धत सुरु झाल्यापासून शालिनीताईंनी सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविले आहे. आता आरक्षण पुन्हा सर्वसाधारण आल्यास शालिनीताईंना पुन्हा संधी आहे.

अध्यक्षपद मिळविण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी भाजप, काँग्रेसचा विखे गट व शिवसेनेचे काही सदस्य अशी युती होऊ शकते. त्यातही शिवसेनेचे दोन सदस्य कमी आहेत. सदस्य राणी लंके यांचे पती राष्ट्रवादीकडून आमदार झाल्याने त्यांचे मत राष्ट्रवादीच्या बाजूने जाऊ शकते. तर भाग्यश्री मोकाटे या गुन्ह्यात फरार असल्याने त्यांना सहभागी होता येणार नाही. भाजपकडून सदाशिव पाचपुते, जालिंदर वाकचौरे तर काँग्रेसच्या विखे गटाकडून राजेश परजणे यांची दावेदारी असू शकते.

दुसरीकडे प्रस्तावित असलेल्या ‘महाशिवआघाडी’तर्फे राष्ट्रवादीच्या विद्यमान उपाध्यक्षा राजश्री घुले, प्रभावती ढाकणे, समाजकल्याण सभापती उमेश परहर, रामभाऊ साळवे काँग्रेसतर्फे सभापती अजय फटांगरे, तांत्रिकदृष्ठ्या काँग्रेसमध्ये असलेल्या सभापती अनुराधा नागवडे यांची नावे आघाडीवर आहेत. विधानसभेनंतर आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याने त्यांचे 6 मतं हे ‘महाशिवआघाडी’च्या पारड्यात पडू शकतात. त्यामुळे त्यांच्या एखाद्या सदस्याला समिती सभापतिपद मिळू शकते. तर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य ऐनवेळेस कुणासाठी ‘धनुष्याला ताण’ देणार हे पाहणेही महत्वाचे आहे.

कोण कुणाकडून? ‘सूत’ जुळेना
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ झाली. तिकीट व सत्तेसाठी अनेकांनी ‘कोलांटउड्या’ मारल्या. नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्तेही गेल्याने अनेक ठिकाणी कोणता जिल्हा परिषद सदस्य कुठल्या पक्षाच्या बाजूचा आहे? याचे गणित जुळलेले नाही. त्यामुळे अध्यक्षपदाच्या तयारीत असलेल्यांना ‘अंदाजपंचे’ ठोकताळे बांधावे लागत असून, अध्यक्षपदाचे ‘सूत’ जुळेना झाले आहे.

असे असू शकते अध्यक्षपदाचे आरक्षण
आतापर्यंत जिल्ह्यात अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाचे एकदा आरक्षण निघाले आहे. एकदा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण होते. सर्वसाधारण व सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण प्रत्येकी एकदा आले. अजून अनुसूचित जमातीचे आरक्षण आलेले नाही. त्यामुळे त्याची शक्यता जास्त आहे. मात्र चिट्ठी टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने यंदा कोणत्या प्रवर्गाचे भाग्य उजळणार हे पाहणे महत्वाचे आहे.